Israel-Hamas War: हमासला संपवल्यानंतर गाझावर कोणाची असेल सत्ता, अमेरिकेने मांडली भूमिका
Israel-hamas war : इस्रायलकडून सतत हमासला संपवण्यासाठी हल्ले होत आहेत. गाझामध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून शोधून त्यांना ठार केले जात आहे. गाझामधून हमासचा नायनाट केल्यानंतर या ठिकाणी कोणाची सत्ता असेल याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे.
Israel-Hamas War : गाझामध्ये इस्रायलकडून हमासच्या ठिकाणांवर हल्ले सुरुच आहेत. इस्रायल हवाई हल्ल्यांसोबतच आता जमिनीवर हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात गुतलं आहे. आतापर्यंत हमासचे 100 हून अधिक कमांडरही मारले गेले आहेत. इतकंच नाही तर 7 ऑक्टोबरला हल्ला करणाऱ्या इब्राहिम बियारीसह अनेक दहशतवाद्यांचाही त्यात समावेश आहे. हमासचा खात्मा होईपर्यंत युद्ध सुरू ठेवण्याची घोषणा इस्रायलने आधीच केली आहे. हमासविरोधात अनेक देशांनी इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे.
गाझावर कोणाचे नियंत्रण असेल?
गाझामध्ये हमासचा खात्मा झाल्यानंतर गाझावर कोणाचे नियंत्रण असेल याबाबत आताच भविष्यवाणी सुरु झाली आहे. अमेरिकाने देखील यावर भाष्य केले आहे. अमेरिकेने म्हटले की, या भागातील प्रशासन काही काळासाठी जवळपासच्या अनेक देशांकडे किंवा संयुक्त राष्ट्रसंघाच्या एजन्सीकडे सोपवले जावे.
गाझा पट्टीचा कारभार चालवण्याची जबाबदारी कोणत्या देशांना द्यायची हे आव्हान असणार आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे संरक्षण मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी मंगळवारी यासंदर्भात बैठक बोलावली होती. यानंतर अनेक पर्यायांचा विचार केल्याचे त्यांनी सांगितले. यापैकी एक म्हणजे अनेक देशांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.
अमेरिकेची भूमिका काय
अँटोनी ब्लिंकन म्हणाले की, पॅलेस्टिनी प्राधिकरणाला शासन देणे योग्य ठरेल, पण हे कसे शक्य होईल, हाही विचार करण्यासारखा विषय आहे. ‘हे शक्य नसेल तर काही तात्पुरती व्यवस्था करावी लागेल. यातील एक म्हणजे अनेक देशांना एकत्र आणून प्रशासन चालवणे. याशिवाय सुरक्षा आणि प्रशासनाची जबाबदारीही संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांना दिली जाऊ शकते.
हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर मोठा हल्ला केला. यामध्ये 1400 इस्रायली मारले गेले. इस्रायलने म्हटले की, होलोकॉस्टनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने ज्यू मारले गेले.
इस्रायलकडून हमासवर हल्ले सुरुच
इस्रायलने हमासला संपूर्णपणे नष्ट करण्याची शपथ घेतली आहे. हे युद्ध आता आम्हीच संपवणार असे इस्रायलच्या पंतप्रधानांनी आधीच जाहीर केले आहे. संयुक्त राष्ट्र आणि अनेक देशांनी युद्ध थांबवण्यासाठी आवाहनही केले. मात्र इस्रायलकडून आपल्या ज्यू लोकांचा बळी घेतलेल्या लोकांना संपवल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका घेण्यात आलीये. पीएम बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धविरामाचे आवाहन फेटाळून लावले.