Iran vs Israel : अन्य मुस्लिम देशांबरोबर मैत्री मग इराण बरोबर इस्रायलच इतकं कट्टर शत्रुत्व का?
Iran vs Israel : इस्रायलच सर्वात मोठं शत्रुत्व पॅलेस्टाइन बरोबर आहे. दीर्घकाळापासून त्यांची लढाई सुरु आहे. मागच्यावर्षी ऑक्टोंबरमध्ये इस्रायल-हमास युद्धाची सुरुवात झाली. अरब जगतातील सुन्नी देश या मुद्यावर पॅलेस्टाइनच्या बाजूने आहेत. पण इस्रायल सुन्नी देशांना आपला शत्रु मानत नाही. मिडिल ईस्टमधल्या घडामोडींसाठी इस्रायल इराणला दोषी मानतो. असं का? समजून घेऊया.
इस्रायल आपल्या जन्मपासूनच संघर्षाचा सामना करतोय. आतापर्यंत या देशाने अनेक युद्ध लढली आहेत. अरब देशांबरोबर अनेक युद्ध लढल्यानंतर 1979 साली इजिप्तने इस्रायलबरोबर संबंध स्थापित केले. त्यानंतर 1994 साली ट्रीटी साइन करत जॉर्डनने इस्रायलसोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर अनेक वर्षांनी 2020 साली UAE, बहरीन, मोरक्को आणि सूडानने इस्रायलला मान्यता दिली. इस्रायल सतत सुन्नी देशांबरोबर आपले संबंध वाढवण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या महिन्यात संयुक्त राष्ट्राच्या महासभेत इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मध्य पूर्वेचे दोन नकाशे दाखवले. यात एकाबाजूला ‘द कर्स’ (अभिशाप) यात शिया देश होते. ईरान, इराक, सीरिया, येमेन आणि लेबनान हे देश होते. नकाशाच्या दुसऱ्याबाजूला ‘द ब्लेसिंग’मध्ये (वरदान) मध्यपूर्वेचे सुन्नी देश होते.
यावरुन एक गोष्ट स्पष्ट झाली, नेतन्याहू आता सुन्नी देशांना इस्रायलसाठी धोकादायक मानत नाहीत. या नकाशातील आणखी एक बाब म्हणजे त्यात पॅलेस्टिनला दाखवलं नव्हतं. त्यावरुन बरेच वेगवेगळे अर्थ काढण्यात आले. इस्रायलसोबत अरब देशांच्या युद्धावर नजर टाकली, तर मुख्य भूमिका सुन्नी देशांनी निभावल्याच लक्षात येईल. इतकच नाही, पॅलेस्टिनच्या जनतेसाठी सर्वाधिक मदत सौदी अरेबिया आणि कतरकडून केली जाते. आजही हा सिलसिला सुरु आहे. इस्रायलच्या स्थापनेपासून आजपर्यंत इराण कधीही इस्रायल विरुद्ध आमने-सामनेची लढाई लढलेला नाही.
5 नोव्हेंबर 1979 इराणच्या सुप्रीम लीडरने काय म्हटलेलं?
1979 सालच्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणने पॅलेस्टाइनच्या मुद्यावर मोकळेपणाने बोलायला सुरुवात केली. वेळेबरोबर इराणची आक्रमकता वाढत गेली. अरब जगतात अमेरिकेचा प्रभाव वाढल्यानंतर सुन्नी देशांची इस्रायलबद्दलची भूमिका नरम होत गेली. त्याचवेळी इराणची भूमिका कठोर होत गेली. इस्लामिक क्रांतीनंतर 5 नोव्हेंबर 1979 साली तत्कालीन सुप्रीम लीडर अयातुल्लाह खुमैनी यांनी अमेरिकेला मोठा शैतान आणि इस्रायलला छोटा शैतान म्हटलं.
In case there is any doubt, Netanyahu made clear with his little map today what normalization really seeks: eliminating Palestine and Palestinians from the region and legitimizing greater Israel, all with the blessing of Arab regimes. pic.twitter.com/nFxwEMAKVR
— Yousef Munayyer (@YousefMunayyer) September 22, 2023
इराण बरोबर शत्रुत्व कसं वाढत गेलं?
हळूहळू सुन्नी अरब देशांनी पॅलेस्टाइनच्या अधिकारांसाठी सैन्य लढाई सोडून दिली. आपला सगळा फोकस डिप्लोमॅटिक पद्धतीने पॅलेस्टाइन राष्ट्र स्थापनेवर केंद्रीत केला. इस्रायलला अरब देशांकडून दिलासा मिळाला. त्याचवेळी इराणकडून धोका वाढू लागला. इराणने हळूहळू शिया मिलिशियाला मजबूत करुन त्यांचा इस्रायल विरोधात वापर सुरु केला. हिज्बुल्लाहची स्थापना करुन इस्रायलला घेरण्याचा प्रयत्न केला. गाजा पट्टीत सुन्नी संघटना हमासला शस्त्र दिली.