Israel-Hamas War | डस्टबिनमधून शोधून शोधून माणसं मारली… हमासने गाठला कौर्याचा कळस
हमासने इस्रायलवर हल्ला केल्याने इस्रायलची मोठी वाताहत झाली आहे. हमासच्या हल्ल्याच्या रोज नव्या गोष्टी पुढे येत आहेत. इस्रायलचे नागरिक डोळ्यासमोर जे घडलं ते सांगत आहेत. गेल्या 50 वर्षात कधीच घडलं नाही ते आम्हाला पाहावं लागतंय असं त्यांचं म्हणणं आहे.
तेल अविव | 12 ऑक्टोबर 2023 : इस्रायलच्या सीमावर्ती गावांमध्ये हमासने नरसंहार सुरू केला आहे. मानवतेला काळीमा फासेल असे कृत्य हमासकडून केलं जात आहे. इस्रायलच्या एका माजी सैनिकाने हमासच्या नरसंहाराचा थरारक अनुभव सांगितलाय. हृदय थरथर कापवणारा हा अनुभव आहे. गेल्या 50 वर्षात देशात असं कधीच झालं नव्हतं, असं हा माजी सैनिक हरजिल म्हणतो. हमासचे 1 हजार अतिरेकी 80 ठिकाणांहून देशात घुसले आणि त्यांनी हाहा:कार उडवून दिलाय. शनिवारी सकाळी आम्ही प्रार्थनेला निघालो होतो. त्याचवेळी अतिरेक्यांनी कहर केला. हा आनंदाचा दिवस आहे हे अतिरेक्यांना माहीत होतं. त्यांनी पूर्ण प्लानिंग केलं होतं. त्यामुळे हल्ल्यासाठी ती वेळ निवडली गेली. लोकं झोपेतून उठलेलेच होते. त्याचवेळी हल्ला झाला, असं हरजिल यांनी सांगितलं. आतापर्यंत 240 हून अधिक इस्रायली नागरिक हमासच्या ताब्यात आहेत. त्यांचा शोध घ्यायला हवा, असंही ते म्हणाले.
अतिरेकी पूर्ण प्लानिंगने आले होते. 22 गावात ते घुसले. घराघरात जाऊन हल्ला केला. त्यांनी पोलीस, आर्मी आणि अन्य नागरिकांना पकडलं आणि घेऊन गेले. हे लोक धर्माच्या नावावर कलंक आहेत. दहशतीच्या नावाखाली लोकांना मारा असं धर्म सांगत नाही. ही दहशतवादी संघटना लेबनान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील लोकांना लालूच दाखवून त्यांना बंदुकीच्या बळावर दहशत निर्माण करण्यासाठी इस्रायला पाठवत असते, असा दावा हरजिल यांनी केला
त्यांना मदत मिळते पण…
ज्यांना अतिरेक्यांनी ओलीस ठेवलं आहे, त्यांना सोडवण्याचा सर्वात आधी लष्कराचा प्रयत्न असेल. गाजा पट्टीमधून बॉम्ब वर्षाव होत आहे. हमासच्या अतिरेक्यांनी रुग्णालये, शाला आणि दुसऱ्या सार्वजनिक जागांवर बॉम्ब वर्षाव सुरू केला आहे. त्यामुळे यावेळी हमासला नेस्तनाबूत केलं जाईल. हमासला दुसऱ्या देशाकडून पैशाची मदत मिळते. पण हे लोक उद्योग आणि शिक्षणावर हा पैसा खर्च करत नाहीत. तर बॉम्ब बनविण्यावर पैसा खर्च करतात, असं ते म्हणाले.
तरीही असे वागत आहेत
हरजिल यांची पत्नी भारतीय आहे. समांथा असं त्यांचं नाव आहे. त्यांनीही या हल्ल्याचा थरारक अनुभव सांगितला. अचानक सायरन वाजला. आम्हाला कळलंच नाही. नंतर आम्ही मुलांना उठवलं. त्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं. हरजिल उठलेले होते. त्यांनी मला चहा बनवायला सांगितला. मी चहा बनवायला चालले होते. तेव्हा पहाटे 6.30 वाजता अतिरेक्यांनी हल्ला केला. ते मुलांच्या पाठीला बंदूक लावून आम्हाला धाक दाखवत होते. जेरूसलेममध्ये ख्रिश्चन, मुस्लिम आणि यहुदी तिघेही शांततेत राहू शकतात. पण या लोकांना तसं होऊ द्यायचं नाही. या लोकांना वीज, खाणंपिणं सर्व इस्रायलमधूनच मिळतं. पण तरीही हे असे वागत आहेत, असं समांथा म्हणाल्या.
डस्टबिनमधून शोधून मारलं
माझी बहीण लांब गावात राहते. तिला सायरन वाजल्याचं कळलंच नाही. गावात अतिरेकी घुसलेत. घराच्या बाहेर पडू नका, हे तिला शेजाऱ्याने सांगितलं. तिचं घर जुनं होतं. या जुन्या घरात तळघरही नव्हतं. त्यामुळे ते घराच्या दरवाजाजवळ येऊन बसले. माझ्या मित्राचा मुलगा आणि त्याची होणारी बायको म्युझिक फेस्टिव्हलमध्ये होते. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ते डस्टबिनमध्ये जाऊन लपले. पण अतिरेक्यांनी डस्टबिनमध्ये शोधून शोधून त्यांना मारलं. 40 मुलांना ठार करण्यात आलं. पूर्वी इस्रायलचे नागरिक गाजा पट्टीत फिरायला जात होते. पण हमासने गाजा पट्टीचा ताबा घेतल्यापासून सर्वच बदललंय, असंही त्यांनी सांगितलं.