Justin Trudeau : सतत भारताला दुखावणाऱ्या जस्टिन ट्रूडो यांना का द्यावा लागला कॅनडाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा?
Justin Trudeau Resignation : जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. जस्टिन ट्रूडो यांनी राजीनामा देताच ट्रूडो यांच्यावर राजीनाम्याची वेळ का आली? ही चर्चा सुरु झाली आहे. मागच्या काही काळात जस्टिन ट्रूडो यांच्यामुळेच भारत-कॅनडा संबंध बिघडले. त्यांनी सातत्याने भारतविरोधी, भारताला दुखावणारी भूमिका घेतली.
सतत भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या जस्टिन ट्रूडो यांना अखेर कॅनडाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. नव्या पंतप्रधानाची निवड होईपर्यंत ट्रूडो आता फक्त काळजीवाहू पंतप्रधान असतील. जस्टिन ट्रूडो यांनी राजीनामा देण्यामागे वेगवेगळी कारणं असल्याच बोललं जातय. जस्टिन ट्रूडो यांच्यावर दबाव होता. यात डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्यान केलं जाणारं ट्रोलिंग तसच स्वकीयांकडूनच बंडखोरीची भिती अशी अनेक कारणं आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यापासून डोनाल्ड ट्रम्प हे जस्टिन ट्रूडो यांना सतत ट्रोल करत होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकताच ट्रम्प यांनी ट्रूडोंना अमेरिकेच्या 51 व्या राज्याचे गव्हर्नर म्हटलं होतं.
ट्रम्प यांच्या विधानाचा अर्थ स्पष्ट होता, ते कॅनडाला अमेरिकेच 51 व राज्य मानतात. इतकच नाही ट्रूडो अमेरिकेत ट्रम्प यांना भेटायला गेले, त्यावेळी त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करताना ट्रम्प यांनी ट्रूडोंना ‘अमेरिकी राज्य कॅनडाच’ गव्हर्नर म्हटलं होतं. ट्रम्प यांच्या या विधानामुळे कॅनडामध्ये ट्रूडो यांची खिल्ली उडवली जात होती. त्याशिवाय ट्रम्प यांनी कॅनडावर 25 टक्के टॅरिफ आकारण्याची धमकी दिली होती.
ट्रूडो यांच्यावर राजीनाम्याचा दबाव का वाढला?
जस्टिन ट्रूडो यांच्या धोरणांमुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवरच बंडखोरीची वेळ आली होती. 2024 च्या अखेरीस ट्रूडो यांच्या मंत्रिमंडळात राजीनाम्याची लाटच आली. 19 सप्टेंबर 2024 ला परिवहन मंत्री पाब्लो रोड्रिग्ज यांनी राजीनामा दिला. 20 नोव्हेंबर 2024 ला अल्बर्टाचे खासदार रँडी बोइसोनॉल्ट यांनी राजीनामा दिला. 15 डिसेंबर 2024 रोजी गृहनिर्माण मंत्री सीन फ्रेजर यांनी कौटुंबिक कारणांचा हवाला देत कॅबिनेट सोडण्याचा मनसुबा बोलून दाखवला. कहर तर तेव्हा झाला, जेव्हा 16 डिसेंबर 2024 रोजी क्रिस्टिया फ्रीलँड यांनी उपपंतप्रधानपदाचा आणि अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला. मंत्रिमंडळातील सहकारी एकापाठोपाठ एक राजीनामा देत असल्यामुळे जस्टिन ट्रूडो यांच्यावर दबाव वाढला होता.
सर्वसामान्य नागरिकांचा संताप का वाढला?
कॅनडामध्ये एकाबाजूला महागाई वाढत चालली आहे. दुसऱ्याबाजूला बेरोजगारी सुद्धा आहे. ट्रूडो यांच्या लिबरल पार्टी विरोधात कंजरवेटिव पार्टीने हा मोठा मुद्दा बनवला होता. कॅनडामध्ये कोविडनंतर बेरोजगारी दर जवळपास 6.5 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. कॅनडामध्ये घरांच्या किंमती सातत्याने वाढत आहेत, ज्यामुळे सर्वसामन्य नागरिकांचा जस्टिन ट्रूडो यांच्यावरील रोष वाढत गेला.