India-Canada Relation : भारताशी पंगा घेणाऱ्या जस्टिन ट्रूडोंना त्यांच्या देशात बसला मोठा झटका
India-Canada Relation : सध्या भारत-कॅनडा संबंध कमालीचे बिघडले आहेत. याला कारण आहे, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो. खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देणे, मतपेटीचा विचार करुन भारतविरोधी खलिस्तानी कारवायांकडे दुर्लक्ष करणे, यामुळे भारत-कॅनडा संबंध बिघडले. आता जस्टिन ट्रूडो यांना मायदेशात मोठा झटका बसला आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना मोठा झटका बसला आहे. मागच्या वर्षभरापासून जस्टिन ट्रूडो यांच्या कार्यकाळात भारत-कॅनडा संबंधात मोठा दुरावा आला आहे. आता कॅनडातील जनता सुद्धा जस्टिन ट्रूडो यांच्यापासून लांब जाऊ लागली आहे. सेंट पॉल येथे झालेल्या पोटनिवडणुकीत ट्रूडो यांच्या लिबरल पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. टोरंटो-सेंट पॉल सीट लिबरल पार्टीचा बालेकिल्ला मानली जायची. मंगळवारी कंजर्वेटिव उमेदवार डॉन स्टीवर्ट यांनी 42 टक्के मत मिळवून सेंट पॉलची जागा जिंकली. लिबरल पक्षाच्या लेस्ली चर्च यांना 40 टक्के मत मिळाली. लेस्ली चर्च पार्लियामेंट हिलचे माजी कर्मचारी आणि वकील आहेत. बऱ्याच काळापासून ते लिबरल पक्षासोबत आहेत.
टोरंटो-सेंट पॉलची सीट मागच्या 30 वर्षांपासून लिबरल पक्षाच्या ताब्यात होती. 2011 साली पक्षावर खूप खराब वेळ आली. त्यावेळी फक्त 34 लिबरल खासदार संसेदत निवडून गेले होते. त्यावेळी सुद्धा टोरंटो-सेंट पॉलची सीट लिबरल पार्टीकडे होती. 2021 च्या निवडणुकीत लिबरल पार्टीच्या उमेदवाराने टोरंटो-सेंट पॉल येथून 49 टक्के मत घेऊन विजय मिळवला होता. लिबरल पार्टीकडे हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 338 पैकी 155 जागा आहेत.
सरकारला हा झटका बसला
पुढच्यावर्षी होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकीआधी जस्टिन ट्रूडो यांच्या सरकारला हा झटका बसला आहे. लिबरल पार्टीचा पराभव होऊनही ट्रूडो यांनी पुढच्यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत लिबरल पार्टीच नेतृत्व करण्याची आणि जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी मेहनत करण्याची शपथ घेतली आहे.
इस्रायल-हमास युद्धावरुनही घेरलं
ट्रूडो यांचे मुख्य स्पर्धक आणि कंजर्वेटिव नेता पियरे पोलीवर यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्रूडो यांच्याकडे मुदतीआधी निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. कंजर्वेटिव पार्टीने लिबरल पार्टीच्या खराब इकोनॉमिक रेकार्ड विरोधात एक अभियान चालवल आहे. पार्टीने इस्रायल-हमास युद्धावरुनही ट्रूडो यांना घेरलं आहे. कंजर्वेटिव पार्टीने ट्रूडो प्रशासनवर इस्रायलच्या बाबतीत नरमाई स्वीकारल्याचा आरोप केला आहे.