तुरुंगात बंद खालिदा झिया बनणार बांगलादेशच्या पंतप्रधान? भारतासाठी धोक्याची घंटा
बांगलादेशातील सत्तापालट झाल्यानंतर राष्ट्रपतींनी मुख्य विरोधी पक्ष नेत्या खालिदा झिया यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांचा पक्ष पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकतो, असे मानले जात आहे. पण त्या जर सत्तेत आल्या तर भारतासाठी अडचणीचं ठरणार आहे. काय आहे त्या मागचं कारण जाणून घ्या.
बांगलादेशात हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांनी सोमवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन शेख हसीना यांचा राजीनामा स्वीकारला असून देशात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. पण महत्त्वाचे म्हणजे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या सुटकेचे आदेशही राष्ट्रपतींनी दिले आहेत. राष्ट्रपती शहाबुद्दीन यांनी संसद बरखास्त करून अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे शेख हसीना यांचे कट्टर प्रतिस्पर्धी खालिदा झिया यांची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना १७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०१८ पासून त्या तुरुंगात आहेत. आता नव्या सरकारच्या स्थापनेत खालिदा झिया यांना पुन्हा एकदा पंतप्रधान केले जाऊ शकते, असे काही जणांचे मत आहे. पण झिया पंतप्रधान झाल्या तर हे भारतासाठी चांगले नसेल. कारण त्या भारतविरोधी आहेत.
खलिदा झिया या विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या प्रमुख आहेत. झिया यांचा जन्म १५ ऑगस्ट १९४५ रोजी बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. त्यांचे पती झियाउर रहमान यांच्या हत्येनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. झियाउर रहमान 1977 ते 1981 पर्यंत बांगलादेशचे राष्ट्रपती होते. त्यांनी 1978 मध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची स्थापना केली. खालिदा झिया 1991 मध्ये बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
दोन वेळा पंतप्रधान
खलिदा झिया 2001 ते 2006 या काळात दुसऱ्यांदा पंतप्रधान राहिल्या. 2007 च्या निवडणुकीत राजकीय हिंसाचार आणि अंतर्गत कलहानंतर निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आणि लष्कराने सत्ता काबीज केली. आपल्या अंतरिम राजवटीत काळजीवाहू सरकारने झिया आणि त्यांच्या दोन मुलांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. सध्या झिया गंभीर आजाराने त्रस्त आहे, अनेकवेळा त्यांचा उपचारासाठी परदेशात जावे लागते.
झिया या चीन-पाकिस्तान समर्थक
बांगलादेशातील शेख हसीना यांची सत्ता सोडून जाणे भारतासाठी चांगले नाही, कारण खलिदा झिया यांच्या राजवटीत भारतासोबत अनेक तणाव निर्माण झाले आहेत, असे जाणकारांचे मत आहे. खालिदा यांचा कल पाकिस्तानकडे आहे आणि त्यांच्या पक्षात कट्टरपंथी आहेत जे भारतासाठी समस्या आहेत. फर्स्ट पोस्टने आपल्या एका वृत्तात जेएनयूचे प्राध्यापक मनीष दाभाडे यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘विरोधी नेत्या खालिदा झिया यांच्या बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीचे कट्टरवादी आणि इस्लामी भारतासाठी समस्या आहेत. बांगलादेशात सुरू असलेल्या आंदोलनाला त्यांनी हायजॅक केले होते. भविष्यात झिया यांची राजवट आली तर ती भारतासाठी अडचणीची ठरेल, कारण मुळात झिया हे चीन आणि पाकिस्तानचे समर्थक आहेत.