किंग चार्ल्स तृतीय ब्रिटनचे नवे ‘सम्राट’; लंडनच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये झाला राज्याभिषेक
महाराणींच्या निधनानंतर ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इतर देशांना आपली करन्सी बदलण्यास वेळ लागणार आहे. याचा अर्थ असा नाही की महाराणींचा फोटो असणाऱ्या नोटा आणि नाणी चालणार नाहीत.
लंडन: महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth II) यांच्या निधनानंतर किंग चार्ल्स तृतीय (Prince Charles) यांना ब्रिटनचे नवे किंग म्हणून घोषित करण्यात आलं आहे. लंडनच्या (London) सेंट जेम्स पॅलेसमध्ये झालेल्या ऐतिहासिक समारंभात हा राज्याभिषेक सोहळा पार पडला. किंग चार्ल्स तृतीय हे 73 वर्षीय आहेत. ते महाराणी एलिझाबेथ यांचे सर्वात मोठे चिरंजीव आहेत. महाराणी एलिझाबेथ यांचं निधन झाल्यामुळे राज्याची सूत्रे किंग चार्ल्स तृतीय यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर 24 तासांच्या आता पारंपारिक पद्धतीने राज्याभिषेकासंदर्भात एक परिषद बोलावण्यात येते. मात्र, महाराणींचं निधन झाल्याची घोषणा करण्यास विलंब झाल्याने ही परिषद शुक्रवारी बोलावण्यात आली नव्हती. त्यामुळे राज्याभिषेकाचा कार्यक्रम आज पार पडला.
किंग चार्ल्स तृतीय यांना किंग घोषित करण्यासाठीची प्रक्रिया अनेक टप्प्यात पार पडली. महाराणींच्या निधानानंतर ध्वज अर्ध्यावर आणण्यात आले होते. मात्र, चार्ल्स तृतीय यांची नवे किंग म्हणून घोषणा केल्यानंतर हे ध्वज पुन्हा फडकवण्यात आले. या कार्यक्रमाचं पहिल्यांदाच टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं होतं. राज्याभिषेक संबंधी परिषदेत कॅबिनेट मंत्री, न्यायाधीश आणि चर्च ऑफ इंग्लंड आदी लोक सहभागी होते. या परिषदते किंग चार्ल्स यांनी महाराणींच्या निधनाची वैयक्तिक माहिती दिली. तसेच चर्च ऑफ स्कॉटलंडच्या संरक्षणाची प्रतिज्ञाही घेतली.
चार्ल्स यांची पत्नी बनली ‘क्वीन कन्सोर्ट’
चार्ल्स सम्राट झाल्यानंतर त्यांची पत्नी कॅमिला क्वीन कन्सोर्ट बनल्या आहेत. तसेच चार्ल्स यांच्या मोठ्या मुलाला विलियमला प्रिन्स ऑफ वेल्सची उपाधी दिली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन हे महारानी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. मला अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती नाहीये. पण मी त्याला जाणार आहे, असं जो बायडेन यांनी म्हटलं आहे. तसेच महाराजा चार्ल्स तृतीय यांच्याशी आपला अजून कोणताही संवाद झालेला नाही. मी त्यांना ओळखतो. मी अजून त्यांच्याशी चर्चा केलेली नाहीये, असं जो बायडेन म्हणाले.
नोटा आणि नाण्यांवर फोटो छापणार
गेल्या अनेक दशकांपासून ब्रिटनच्या नोटा आणि नाण्यांवर महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा फोटो लावण्यात आला आहे. जगातील डझनभर देशातील नोटा आणि नाण्यांवर महाराणींचा फोटो आहे. महाराणींच्या निधनानंतर ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इतर देशांना आपली करन्सी बदलण्यास वेळ लागणार आहे. याचा अर्थ असा नाही की महाराणींचा फोटो असणाऱ्या नोटा आणि नाणी चालणार नाहीत. आता या नोटा आणि नाण्यांवर महाराणींच्या ऐवजी किंग चार्ल्स यांचा फोटो असेल. हे पटकन होणार नाही. सध्यस्थितीत महाराणींचा फोटो असलेल्या नोटा आणि नाणी कायदेशीरित्या वैध असतील, असं बँक ऑफ इंग्लंडने म्हटलं आहे.