Polaris Dawn : सुनीता विलियम्सना परत आणण्याची जबाबदारी असलेल्या SpaceX ची मोठी झेप, एकदा हे वाचा
SpaceX Polaris Dawn : 'पोलारिस डॉन' हे जगातील पहिलं प्रायवेट स्पेसवॉक असलेलं मिशन होतं. एलन मस्क यांची एयरोस्पेस कंपनी स्पेसएक्सने हे मिशन प्रत्यक्षात आणलं. एकूणच अवकाश संशोधनाच्या दृष्टीने हे मिशन किती महत्त्वाच होतं? त्यामागे काय उद्दिष्टय होती? भविष्यात त्यामुळे काय फायदा होणार? अमेरिकेची सर्वोच्च अवकाश संशोधन संस्था नासा यामागे काय विचार करते? हे या लेखातून जाणून घ्या.
Polaris Dawn Spacewalk : आपल्या सभोवतालच विश्व म्हणजे निर्सग. हवा, पाणी आणि जमीन हे निसर्गामधले महत्त्वाचे घटक. आज पृथ्वीवर या तिन्ही गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. अनेक नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणू शकतो. जसं आपल्या सभोवतालच विश्व म्हणजे निर्सग, तसं पृथ्वीच्या सभोवतालच विश्व म्हणजे अवकाश. या अवकाशाने नेहमीच मानवी मनात कुतूहल निर्माण केलय. या अवकाशाकडे पाहून अनेक प्रश्न मनात जन्म घेतात. माणूस त्याच्या सवयीप्रमाणे या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. काही उत्तरं अजूनही अनुत्तरित आहेत. अवकाशाबद्दल अजूनही अनेक रहस्य कायम आहेत. ही रहस्य उलगडण्याचा, शोधण्याचा प्रयत्न कायम आहे.
सध्या अवकाश क्षेत्र दोन वेगवेगळ्या घटनांमुळे चर्चेत आहे. पहिली घटना भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. कारण भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स अजूनही अवकाशातच आहेत. दहा दिवसाच्या मिशनवर गेलेल्या सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर अवकाशातच अडकून पडले आहेत. त्यांना आता स्पेसएक्सच्या क्रू 9 मिशनमध्ये ट्रान्सफर करण्यात आलय. सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर बोईंगच्या ज्या स्टारलायनर यानाने गेले, ते मात्र पृथ्वीवर सुरक्षित परतलं. स्टारलायनर स्पेसक्राफ्टमध्ये तांत्रिक बिघाड हे सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर अवकाशात अडकून पडण्यामागच कारण आहे. सध्या ते ISS म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर आहेत.
या मिशनमागे अमेरिकेच उद्दिष्ट्य काय होतं?
अवकाश क्षेत्रातील दुसरी मोठी घटना म्हणजे ‘पोलारिस डॉन’ च पृथ्वीवर यशस्वी लँडिंग. ‘पोलारिस डॉन’ हे खूप खास मिशन होतं. कारण या मिशनमध्ये पहिल्यांदा प्रायवेट स्पेसवॉक करण्यात आला. याआधी अंतराळवीरांनी स्पेसवॉक केलाय. पण सामान्य माणसांनी स्पेसवॉक करण्याची ही जगातील पहिली घटना आहे. स्पेसवॉक आणि ‘पोलारिस डॉन’ हे मिशन वाटतं तितकं सोप नव्हतं. या मिशनमागे अनेक दूरगामी उद्दिष्टय होती. अमेरिकेसाठी आता अवकाश हा फक्त संशोधनाचा विषय राहिलेला नाही. अवकाशाकडे अमेरिका आता एक बिझनेसमन म्हणून पाहते. अमेरिकेची मुख्य अवकाश संशोधन संस्था NASA ने आता ‘SPACE’ क्षेत्राला बिझनेस म्हणून विकसित करायला सुरुवात केली आहे. पृथ्वीच खालचं ऑर्बिट म्हणजे पृथ्वीची खालची कक्षा खासगी कंपन्यांसाठी खुली करण्याची नासाची योजना आहे. त्या दृष्टीने नासाने पावल देखील उचलली आहे.
एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीसाठी मोठं यश
स्पेसएक्स, ब्ल्यू ओरिजिन, रॉकेट लॅब आणि अन्य काही कंपन्या आता स्पेस बिझनेसमध्ये उतरल्या आहेत. आपल्या खासगी स्पेसक्राफ्टने सर्वसामान्यांना अवकाशाची सफर घडवून आणणं, त्यातून कमाई हे या कंपन्यांच उद्दिष्टय आहे. आतापर्यंत अनेक खासगी स्पेस मोहिमा झाल्या आहेत. ‘पोलारिस डॉन’च यश हे अमेरिकन उद्योजक एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीसाठी मोठं यश आहे. स्पेसएक्सने ‘पोलारिस डॉन’ मिशनची आखणी केली होती. मागच्या तीन-चार वर्षात स्पेसएक्सने अनेक यशस्वी अवकाश मोहिमा केल्या आहेत. त्यामुळे स्पेसएक्सने बोईंग आणि ब्लू ओरिजिन या प्रायवेट स्पेस कंपन्यांच्या स्पर्धेत आपली स्थिती अजून भक्कम केली आहे.
Splashdown of Dragon confirmed! Welcome back to Earth, @rookisaacman, @kiddpoteet, @Gillis_SarahE, @annawmenon pic.twitter.com/nILpMQh2sR
— SpaceX (@SpaceX) September 15, 2024
मिशन लांबणीवर का गेलं?
‘पोलारिस डॉन’ ही मानवी अवकाश मोहिम होती. अब्जाधीश बिझनेसमन जेरेड इसाकमॅन यांनी या मिशनचा सर्व खर्च केला. तेच या मिशनचे संयोजक आणि संचालक होते. इसाकमॅन याआधी सुद्धा अवकाशात गेले आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये त्यांनी स्पेसएक्सच्या इंस्पिरेशन 4 मिशनच नेतृत्व केलं होतं. इंस्पिरेशन 4 ही पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणारी पहिली खासगी क्रू असलेली स्पेसफ्लाइट होती. पोलारिस डॉन मिशन यासाठी खास आहे कारण, या मोहिमेत पहिल्यांदा स्पेसवॉक करण्यात आला. पहिल्यांदा सामान्य माणूस अवकाशात चालला. हे स्पेसवॉक मिशन 2022 मध्येच लॉन्च होणार होतं. पण वेगवेगळ्या अडथळ्यांमुळे हे मिशन दोन वर्ष लांबणीवर गेलं.
या मिशनमध्ये सहभागी झालेले चारजण कोण?
मागच्या आठवड्यात 10 सप्टेंबरला मंगळवारी पोलारिस डॉन मिशनची सुरुवात झाली. स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटने अंतराळवीरांसह उड्डाण केलं. मिशनमध्ये एकूण चार अंतराळवीर होते. जेरेड इसाकमॅन, अमेरिकी एअर फोर्सचे रिटार्यड लेफ्टिनेंट कर्नल स्कॉट ‘किड’ पोटेट आणि स्पेसएक्सच्या दोन इंजिनिअर सारा गिलिस आणि ऐना मेनन. इसाकमॅन या मिशनमध्ये कमांडर होते. स्कॉट पोटेट यांनी मिशनमध्ये पायलटच काम केलं. सारा गिलिस मिशन स्पेशलिस्ट आणि ऐना मेनन मिशन स्पेशलिस्ट आणि मेडिकल ऑफिसर म्हणून मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या.
स्पेसशूट स्पेसशिपशी जोडलेले
12 सप्टेंबर या मिशनमधला खास दिवस होता. सर्वप्रथम जेरेड इसाकमॅन यांनी कॅप्सूल खोललं व अवकाशात पाऊल ठेवलं. ‘अवकाशातून पृथ्वी एक आदर्श जगासारखी दिसते’ असं जेरेड इसाकमॅन यावेळी म्हणाले. त्यानंतर स्पेसएक्सची इंजिनियर सारा गिलिस बाहेर आली. दोघांनी मिळून 20 मिनिट अवकाशात स्पेसवॉक केलं. या दरम्यान सगळ्यांचे स्पेसशूट स्पेसशिपशी जोडलेले होते.
अवकाशात स्पेसवॉक का करतात?
स्पेसवॉक का करतात? असा प्रश्न तुमच्या मनात असेल. स्पेसवॉक एका महत्त्वाच्या कारणांसाठी करावा लागतो, तो म्हणजे स्पेसक्राफ्ट अवकाश यानाची देखभाल, दुरुस्तीसाठी. आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर तैनात अवकाशवीरांना अनेकदा या कारणांसाठी स्पेसवॉक करावा लागतो. अवकाशात गुरुत्वाकर्षण पृथ्वीसारखं नसतं. अत्यंत स्क्षूम गुरुत्वाकर्ष आहे. त्या वातावरणात मानवी शरीर कशा पद्धतीने काम करतं, हे अंतराळवीरांना समजतं. अवकाशातील वावर अधिक सुलभ व्हावा यासाठी अजून काय सुधारणात करता येतील? हे स्पेसवॉकमुळे लक्षात येतं. स्पेसएक्सच्या ‘पोलारिस डॉन’ मिशनमध्ये स्पेसवॉक नव्या EVA सूटसाठी करण्यात आलं. EVA सूटची चाचणी हा मुख्य उद्देश होता. चंद्र आणि मंगळ मोहिमांसाठी EVA सूट डिझाइन करण्यात आला आहे.
पृथ्वीपासून सर्वाधिक दूर अंतरावर जाऊन परतले
पोलारिस डॉनच्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलला रेजिलिएंस म्हटलं जातं. या मिशनने एक इतिहास रचला. या मिशनच्या पहिल्याच दिवशी रेजिलिएंस कॅप्सूल 1,400.7 किलोमीटर या सर्वाधिक उंचीपर्यंत गेली. पृथ्वी बाहेरच्या कक्षेत सर्वाधिक उंचीवर गेलेलं हे पहिलं मानवी मिशन आहे. 1972 साली नासाचं अपोलो मिशन संपलं. त्यानंतर कुठलही मानवी मिशन इतक्या उंचीवर गेलेलं नाही. त्यावरुन तुम्हाला अंदाज आला असेल, हे कॅप्सूलमधील चार अंतराळवीर अवकाशात किती उंचावर जाऊन पृथ्वीवर परतले. अपोलो ही नासाची चंद्र मोहिम होती. अपोलो स्पेस मिशनमध्ये सर्व पुरुष अंतराळवीर होते. त्यामुळे गिलिस आणि मेनन यांना अवकाशात सर्वात दूरचा पल्ला गाठणाऱ्या महिला अंतराळवीर बनण्याचा मान मिळालाय. अन्य कुठल्याही महिला अवकाशात पृथ्वीपासून इतक्या लांब गेलेल्या नाहीत.
12 सप्टेंबरला तो क्षण आला
EVA सूट चाचणीसाठी क्रू ड्रॅगन रेजिलिएंस 1,400.7 किलोमीटर उंचीवरुन 730 किलोमीटरपर्यंत खाली आलं. स्पेसवॉक दरम्यान डीकंप्रेशन सिकनेस होऊ नये, म्हणून दोन दिवस ‘प्री-ब्रीदिंग’चा सराव केला. डीकंप्रेशन सिकनेस ‘द बेंड्स’ म्हणूनही ओळखला जातो. स्कूबा डायवर्सना ही समस्या येते. रक्तात मिसळलेला नायट्रोजनचा प्रेशर वेगाने कमी झाल्यानंतर डीकंप्रेशन सिकनेसची स्थिती उदभवते. दोन दिवस अंतराळवीरांनी याचीच तयारी केली. गुरुवारी सकाळी 12 सप्टेंबरला तो क्षण आला. इसाकमॅन यांनी आपलं डोकं खुल्या हॅचमधून बाहेर काढलं व स्कायवॉकरवर चढून खाली पृथ्वीच जबरदस्त दृश्य पाहिलं.
‘स्टँड अप EVA’ म्हणजे काय?
इसाकमॅन जवळपास आठ मिनट कॅप्सूलच्या बाहेर होते. त्यानंतर गिलिस हॅचच्या बाहेर आल्या. त्या सात मिनट आणि 15 सेकंद बाहेर होत्या. एस्ट्रोफिजिसिस्ट आणि सॅटेलाइट ट्रॅकर जोनाथन मॅकडॉवेल यांच्यानुसार, दोघांपैकी एकही अंतराळवीर मोकळेपणाने स्पेसवॉक करु शकला नाही. याला ‘स्टँड अप EVA’ म्हटलं जातं. दोघेही रेजिलिएंसच्या संपर्कात होते. मेनन आणि पोटेट कॅप्सूलच्या आत होते. मिशनमधला सर्वात चर्चित भाग स्पेसवॉक होता. पोलारिस डॉन क्रू सदस्यांनी ऑर्बिटमध्ये पाचदिवस अनेक कामं केली. मिशनने 31 वेगवेगळ्या इंस्टीट्यूट्ससाठी जवळपास 40 वैज्ञानिक प्रयोग केले. या प्रयोगांमुळे नासाच्या ह्यूमन रिसर्चला फायदा होणार आहे.
पुढचे दोन लॉन्च कधी?
पोलारिस प्रोग्रॅम तीन भागांमध्ये आहे. पोलारिस डॉन हा पहिला टप्पा होता. इसाकमॅन यांनी सर्व फंडिंग केली. चंद्र, मंगळ मिशन हे स्पेसएक्सच उद्दिष्टय आहे. स्पेसएक्सने पुढच्या दोन लॉन्चची माहिती दिलेली नाही. या मिशनमुळे स्पेसएक्सची अवकाश संशोधनातील विश्वासहर्ता प्रचंड वाढली आहे. भविष्यात स्पेसएक्स अवकाश संशोधनात अनेक नवीन इतिहास रचू शकते.
मॅक्सिकोच्या खाडीत सुरक्षित लँडिंग
‘पोलारिस डॉन’चे सर्व क्रू सदस्य रविवारी 15 सप्टेंबरला पृथ्वीवर परतले. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजून 6 मिनिटांनी क्रू ड्रॅगन कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यापासून दूर मॅक्सिकोच्या खाडीत सुरक्षितरित्या उतरलं. चारही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरुप परतले.