मुंबई : मुसळधार पावसाने ब्राझीलमध्ये (Brazil) हाहाकार माजवला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे जवळपास 91 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील मिळते आणि हा आकडा वाढण्याची भिती आहे. तर 26 लोक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती सिव्हिल डिफेन्सने दिलीये. बुधवारी मुसळधार पाऊस (Rain) सुरू झाल्यापासून सुमारे 4,000 लोकांची घरे वाहून गेली आहेत. 14 नगरपालिकांनी आणीबाणी जाहीर केली आहे, यावरूनच आपल्याला समजू शकते की ब्राझीलमधील परिस्थिती किती गंभीर आहे. रेसिफे शहराच्या आसपासच्या लोकांना भूस्खलनानंतर इतरत्र जाण्याचे आवाहन देखील करण्यात आलेय. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी इमारतींमध्ये नागरिकांना (Citizen) हलवण्यात आले.
ब्राझीलच्या ईशान्येला जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. काही भागात 24 तासांमध्येच फक्त मे महिन्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला. सध्या जरी पाऊस थांबला असला तरीही धोका अजून पूर्णपणे टळलेला नाहीये. कारण पुढील दोन दिवसांमध्ये आणखी 30 ते 60 मिमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर काही भागांमध्ये 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळेच काही भागांमध्ये भूस्खलनाचा धोका अधिक असल्याचे देखील सांगितले जाते आहे. डिसेंबरमध्ये मुसळधार पावसामुळे दोन धरणे फुटली होती. त्यामध्ये काही लोक वाहून गेले तर रस्ते देखील पाण्याखाली गेले होते.
जसजसे तापमान वाढते तसे ब्राझीलच्या या भागात पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे. ब्राझीलमधील भूस्खलनामध्ये अनेक लोकांची घरे गेली आहेत. यामुळे आज अनेक कुटुंबियांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या लोकांना शाळा आणि महाविद्यालयामध्ये राहण्यासाठी जागा देण्यात आली आहे. पेरनाम्बुको राज्याची राजधानी रेसिफेमध्ये शुक्रवार आणि शनिवारी अनेक मृत्यू झाले. ब्राझीलमधील अनेक शहरी भागांप्रमाणेच रेसिफेचे अनेक परिसर धोका असलेल्या ठिकाणी बांधले गेले आहेत.