भारतासोबत पंगा घेतल्याने मालदीव संकटात, कर्जबाजारी होण्याची वेळ
India-maldive row : भारतासोबत पंगा घेणं मालदीवसाठी धोक्याची घंटा आहे. मालदीवची अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारीत आहे. पण त्यामुळे मालदीवचे मोठे नुकसान होत आहे. भारतीयांनी मालदीवला पाठ दाखवली आहे. भारताविरोधी भूमिका घेणारे मालदीवचे राष्टाध्यक्ष देशाला कर्जबाजारी करण्याच्या मार्गावर आहेत.
India Maldive row : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या आडमुठेपणामुळे मालदीवला कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ शकते. चीनच्या जवळ जाणे मालदीवला भविष्याच महागाड पडू शकते. आधीच कर्जाचा बोजा असलेल्या मालदीवला ते आणखी कर्जाच्या दरीत लोटत आहेत. दुसरीकडे आता भारताने देखील मालदीवला देत असलेल्या मदतीत मोठी कपात केली आहे. त्यात आता मालदीव पुन्हा एकदा चीनकडून कर्ज घेण्याच्या तयारीत आहे. पण ही गोष्ट मुइज्जू यांना समजण्यापलीकडे आहे. अनेक दशकांपासून भारताने मालदीवला मदत केली आहे. पण मालदीवमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर ते चीनशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण ते चीन समर्थक मानले जातात.
चीनकडून आणखी कर्ज
चीनचे मालदीवर एकूण कर्जाचे 20 टक्के आहे. आयएमएफने देखील चीनला याबाबत आधीच अलर्ट केले आहे. पण आता आणखी कर्ज घेतल्याने मालदीववर चिनी कर्जाचे प्रमाण तब्बल 37% होणार आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, मालदीववर चीनचे 1.37 अब्ज डॉलरचे कर्ज आहे.
चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) मध्ये सहभागी होणारा मालदीव हा दक्षिण आशियातील पहिला देश आहे. मालदीवची लोकसंख्या 5 लाख आहे. छोटा देश असला तरी त्याचे समुद्रातील महत्त्व जास्त आहे.
आयएमएफच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत चीनसोबतचे संबंध दृढ करण्याचा सातत्याने प्रयत्न मुइज्जू करत आहेत. चीनने आधीपासूनच मालदीवमध्ये आपले पाय रोवण्यास सुरुवात केली होती. मालदीवचा जीडीपी फक्त 5 अब्ज डॉलर्स आहे. पण त्याहून जास्त त्यांच्यावर कर्ज आहे.
भारत विरोधी भूमिका
गेल्या महिन्यात मुइज्जू चीन दौऱ्यावर गेले होते. यानंतर त्यांनी सतत भारत विरोधी भूमिका घेतली आहे. त्यांनी चीनकडे कर्जाची पुनर्रचना करण्याचे आवाहन केले आहे. मुइज्जू भारतासोबत पंगा घेऊन चीनसोबत जवळीक वाढवत आहेत.
मालदीवचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत पर्यटन उद्योग आहे. मालदीवमध्ये सर्वाधिक पर्यचटक भारतातून जात होते. पण भारतासोबत पंगा घेतल्यानंतर भारतीय पर्यटकांनी मालदीवला पाठ दाखवली आहे. याचा मोठा फटका त्यांना बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर या वादाला तोंड फुटले. यानंतर सोशल मीडियातून मालदीववर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली.
या वर्षी भारतीय पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. यानंतर मुइज्जू यांनी चीनला मालदीवमध्ये अधिक पर्यटक पाठवण्याचे आवाहन केले होते.