मालदीव पुन्ही एकदा भारतासोबत पक्की करणार मैत्री, मुइज्जू सरकारचे संकेत
भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील संबंध काही काळापासून ताणले गेले होते. पण आता पुन्हाएकदा दोन्ही देशांमधील संबंध सुधारत असल्याचं दिसत आहे. मुईज्जू सरकार आर्थिक संकटात सापडल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा भारताची मदत घ्यावी लागलीये.
मालदीव सध्या आर्थिक संकटात आहे. त्यामुळे त्यांना परराष्ट्र धोरणात बदल करण्याची गरज भासली आहे. विशेषत: भारताच्या सोबत त्यांना अधिक चांगले संबंध टिकवावे लागणार आहे. चीन समर्थक नेता राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या प्रशासनाला त्यामुळे मोठ्या आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनी रणनीती ही बदलली आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी भारताला मालदीवचा “जवळचा मित्र” म्हटले आहे.
मुइज्जू यांनी मानले भारताचे आभार
शुक्रवारी मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात मुइज्जू यांनी भारताचा विशेष उल्लेख केला. भारताने मालदीवला $50 दशलक्ष कर्ज दिल्यानंतर कर्जाची परतफेड सुलभ करण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले. यूकेसोबत मुक्त व्यापार करारासाठी (FTA) सुरू असलेल्या वाटाघाटींचा खुलासा केला आणि भारतासोबतही असाच करार होण्याची आशा व्यक्त केली. मालदीव सरकार बीजिंग आणि नवी दिल्ली यांच्याशी स्थानिक अमेरिकन डॉलरची कमतरता दूर करण्यासाठी चलन अदलाबदल करारावर वाटाघाटी करत आहे.
मालदीव आर्थिक संकटात
राजनैतिक चुकांमुळे मालदीव आर्थिक अडचणीत आला आहे. मालदीवच्या तीन उप-मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीपच्या दौऱ्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते. यामुळे भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकल्याने मालदीवला मोठा झटका लागला होता.
अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम पाहता मालदीव सरकार आता पुन्हा एकदा भारताकडे आशेने पाहत आहे. भारतातील अधिकाधिक भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मालदीवचे पर्यटन मंत्री इब्राहिम फैसल या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. 30 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथे भेट देणार आहेत. मोहिमेचा उद्देश मालदीव आणि भारत यांच्यातील पर्यटन संबंधांना पुनरुज्जीवित करणे आहे, ज्यामुळे मालदीव हे भारतीय पर्यटकांसाठी प्रमुख गंतव्यस्थान म्हणून आकर्षित होईल.
भारत-मालदीव संबंध सुधारत आहेत
तणावानंतर मालदीव-भारत संबंध पुन्हा एकदा चांगले होताना दिसत आहे. गेल्या महिन्यात, मुइज्जू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सलग तिसऱ्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. ज्यामुळे राजनैतिक संबंधांमध्ये सुधारणा झाल्याचे संकेत मिळाले. मालदीवच्या आर्थिक पुनरुत्थानात भारताची भूमिका महत्त्वाची आहे, हे मुइज्जू यांना कळून चुकल्याचे दिसते. ऐतिहासिकदृष्ट्या, भारत मालदीवला आर्थिक मदत आणि विकास सहाय्य प्रदान करणारा एक प्रमुख मित्र आहे.