Modi in UAE : यूएईमध्ये पहिल्या हिंदू मंदिराच्या उद्घटनाआधी मुसळधार पाऊस
UAE Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या यूएई दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी यूएईमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यादरम्यान यूएईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. यूएईमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
UAE Rain update : अबूधाबी येथे UAE मधील पहिले हिंदू मंदिर बांधण्यात आले आहे. BAPS ने बांधलेले हे मंदिर अतिशय भव्य आहे. या मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्त 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 आणि 14 फेब्रुवारी रोजी UAE दौऱ्यावर आहेत. बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी ते या हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. यादरम्यान पीएम मोदी यूएईमधील भारतीय समुदायाला संबोधित करतील. ‘अहलान मोदी’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. अरबीमध्ये याचा अर्थ ‘वेलकम टू मोदी’ असा होतो. मात्र, या कार्यक्रमापूर्वी UAE मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.
मंदिराच्या उद्घाटनाआधी UAE मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय समुदायातील लोकांमध्ये या कार्यक्रमाबद्दल प्रचंड उत्साह दिसून येत आहे. मंगळवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे येथे वाहतूक कोंडी आणि पाणी साचल्याचे दिसून आले.
35 हजार लोकं राहणार उपस्थित
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अबूधाबीच्या झायेद स्पोर्ट्स सिटी स्टेडियममध्ये या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. एका संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, खराब हवामानामुळे लोकांची संख्या 35 हजारांवर आली आहे. यापूर्वी 80 हजार लोक येणे अपेक्षित होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 60 हजार लोकांनी नोंदणी केली होती. मात्र, पाऊस पडल्यानंतरही या मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला 35,000 ते 40,000 लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या सहभागींचा समावेश आहे. 500 हून अधिक बसेस यावेळी धावणार आहेत. तर 1000 हून अधिक स्वयंसेवक कार्यक्रमस्थळी मदत करतील.
UAE मध्ये पावसानंतर अलर्ट
मुसळधार पाऊस, गारपीट, गडगडाटासह पावसामुळे संपूर्ण UAE मध्ये सुरक्षा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. UAE मध्ये वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. UAE मध्ये अंदाजे 35 लाख भारतीय प्रवासी राहतात, जे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 35 टक्के आहे. या कार्यक्रमात 700 हून अधिक कलाकार सांस्कृतिक मनोरंजन करणार आहेत. जे भारताची विविधता जिवंत करतील. केवळ UAE मध्येच नाही तर जगभरातील भारतीयांमध्ये या कार्यक्रमाबद्दल प्रचंड उत्साह आहे.