ढिगारा उपसताच मृतदेह निघतात, मृत्यूचं असं तांडव कुणीच पाहिलं नाही, आतापर्यंत सापडले 2 हजार मृतदेह; काय घडलं असं?
गगनचुंबी इमारती कोसळल्या. ऐतिहासिक इमारतीही जमीनदोस्त झाल्या. ढिगाऱ्याखाली हजारो लोक गाडली गेली. ढिगारा उपसताच मृतदेह सापडतो. असं मृत्यूचं तांडव कधीही कुणीही पाहिलं नव्हतं. त्यामुळे सुरू झालेला आक्रोश आणि मातम थांबता थांबत नाहीये.

रबात | 10 सप्टेंबर 2023 : आफ्रिकेतील अत्यंत महत्त्वाच देश असलेल्या मोरोक्कोत शुक्रवारी रात्री भूकंप आला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.8 एवढी मोजल्या गेली. हा महाभीषण भूकंप होता. भूकंपात अनेक घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे रात्री गाढ झोपेत असलेले नागरिक झोपेतच गाडले गेले. या भूकंपात आतापर्यंत दोन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्या ठिकाणी ढिगारा उपसला जातोय तिथे मृतदेह सापडत आहेत. मृतदेह सापडत नाही अशी एकही जागा नाही. अख्खा दिवस गेला, रात्र सरली तरी मृतदेह निघायचं थांबत नाहीये. मृत्यूचं असं तांडव कधीही कुणी पाहिलं नव्हतं, इतकं भयानक दृश्य सध्या मोरोक्कोत झालं आहे. एखाद्या भीतीदायक भागासारखा मोरोक्कोतील प्रत्येक भाग दिसत आहे.
मोरोक्कोत प्रचंड भूकंप झाल्याने प्रचंड हानी झाली आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. सोशल मीडियात त्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या भूकंपात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. भूकंपात कुणाचा मुलगा गेलाय, कुणाचा बाप, कुणाची आई, तर कुणाचे आजीआजोबा. मोरोक्कोतील प्रत्येक चेहऱ्यावर उदासपण आहे. लोक धायमोकलून रडत आहेत. त्यांचे अश्रूच थांबताना दिसत नाहीये. तर काहींचे रडून रडून डोळे सूजले आहेत. सांत्वन करावे तर कुणाचे करावे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कारण प्रत्येकाच्या घरातील कोण ना कोण या भूकंपाने हिरावून घेतला आहे. मोरोक्कोत अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. देशात तीन दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.
व्हिडीओही धक्कादायक
मोरोक्कोत सर्वाधिक नुकसान माराकेश येथे झालं आहे. या भागातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियात जे व्हिडीओ व्हायरल होत आहेत, त्यात मोरोक्कोतील ऐतिहासिक इमारती, गगनचुंबी इमारती आणि मशिदीही हलताना दिसत आहेत. 1960 नंतरचा मोरोक्कोतील हा सर्वात भीषण आणि भयानक भूकंप आहे. या भूकंपात होत्याचं नव्हतं झालं आहे.
रस्त्यावरच झोपले
मोरोक्कोत ज्यावेळी भूकंप झाला तेव्हा काही लोक शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि प्ले ग्राऊंडमध्ये होते. जमीन हादरताच लोकांमध्ये एकच पळापळ सुरू झाली. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळत सुटले. घाबरलेल्या लोकांनी संपूर्ण रात्र रस्त्यावरच जागून काढली. मोरोक्कोतील भूकंप एवढा शक्तीशाली होता की पोर्तुगाल आणि अल्जिरियातही या भूकंपाचे धक्के जाणवले.
आक्रोश आणि मातम सुरू
भूकंपानंतर काही सेकंदातच आक्रोश आणि मातम सुरू झाला. वाचवा वाचवाचा टाहो फोडला गेला. प्रत्येकजण जीव वाचवण्यासाठी पळत होता. प्रत्येकजण हतबल होता. ज्या ठिकाणी सुरक्षित वाटेल तिथे जाऊन थांबत होता. भूकंपानंतर तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आलं. काँक्रिटच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. ढिगारे हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरूच आहे. सर्वाधिक मृतदेह हे ढिगाऱ्याखालूनच काढण्यात आले.
दरडी रस्त्यावर
मोरोक्कोतील डोंगराळ भागातही मोठं नुकसान झालं आहे. हा भूकंप इतका शक्तीशाली होता की डोंगराळ भागातील दरडी कोसळल्या. दरडी कोसळून रस्त्यावर आल्या. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी युद्धपातळीवर हटवण्यता आली. दरडी कोसळल्याने बचावकार्यात अडचणी येत होत्या. भूकंपातून लोकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा म्हणून लष्कराचीही मदत घेतली जात आहे.