Champions Trophy साठी पाकिस्तानात का जायचं? बघा, किती मस्त, मजेत राहतोय मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड
सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवरुन वाद सुरु आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानात टीम पाठवायला नकार दिला आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच यजमानपद पाकिस्तानकडे आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि तिथल्या क्रिकेटपटुंची भारतावर आगपाखड सुरु आहे. पण टीम इंडियाने पाकिस्तानात का जाऊ नये? त्यासाठी एकदा ही बातमी वाचा.
जो सुधरेल तो पाकिस्तान कुठला? पाकिस्तानची इच्छा आहे की, भारताने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी त्यांच्या देशात यावं. टीम इंडियाने पाकिस्तानात जावं, यासाठी त्यांच्याकडून बरेच प्रयत्न सुरु आहेत. पण दुसऱ्याबाजूला दहशतवादी मस्त पाकिस्तानात खुलेआम फिरत आहेत. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड जकीउर रहमान लखवीचा एक व्हिडिओ समोर आलाय. त्यातून पाकिस्तानचा खोटा चेहरा पुन्हा एकदा उघडा झालाय.
भारत ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये व्यत्यय आणतोय, असं वातावरण पाकिस्तानकडून तयार केलं जातय. खेळाकडे राजकीय दृष्टीने पाहिलं जातय, असं पाकिस्तान दाखवण्याचा प्रयत्न करतय. पण पाकिस्तानातूनच समोर आलेल्या एका व्हिडिओने सत्य समोर आलय. व्हिडिओमध्ये हा जो व्यक्ती आहे, तो कोण आहे? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तो व्यक्ती व्यायाम करताना दिसतो. फिटनेस ट्रेनरच्या देखरेखीखाली मस्त त्याची VVIP सारखी फिटनेस ट्रेनिंग सुरु आहे.
खरंतर तो तुरुंगात असला पाहिजे
हा व्यक्ती दुसरा-तिसरा कोणी नसून हा जकीउर-रहमान लखवी आहे. त्याचे हात अनेक निष्पापांच्या रक्ताने माखले आहेत. हा तोच जकीउर-रहमान लखवी आहे, जो मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि हँडलर आहे. खरंतर तो तुरुंगात असला पाहिजे. पण तो खुलेआम फिरतोय. फिटनेस ट्रेनरच्या अंडर त्याची मस्त ट्रेनिंग सुरु आहे. भारत पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी का जात नाही? त्याच हे उत्तर आहे. कारण ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने ज्या लाहोरमध्ये होणार आहेत, तिथेच हा खतरनाक दहशतवादी मस्त, मजेत राहतोय.
आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित
या लखवीला पाकिस्तानी कोर्टाने जगाला दाखवण्यासाठी तुरुंगात पाठवलं. पण तो लाहोरमध्ये मोकळ्या हवेत श्वास घेतोय. संयुक्त राष्ट्र संघाने लखवीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. लाहोर तेच शहर आहे, जिथे भारतीय क्रिकेट संघाला मॅच खेळायची आहे.
तो ‘चाचू’ नावाने सुद्धा ओळखला जातो
26/11 हल्ल्यात जिवंत हाती लागलेला दहशतवादी अजमल कसाबसह अन्य दहशतवाद्यांना याच लखवीने ट्रेनिंग दिली होती. तो ‘चाचू’ नावाने सुद्धा ओळखला जातो. या लखवीनेच मुंबईवरील हल्ल्याचा कट रचला होता. त्यानेच 10 दहशतवाद्यांना मुंबईत पाठवल्याच चौकशीत समोर आलेलं.