सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तान भेट अज्ञात कारणांमुळे पुढे ढकलली आहे. शनिवारी याबाबत माहिती देण्यात आली. ‘जियो न्यूज’च्या वृत्तानुसार, मोहम्मद बिन सलमान दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर येणार होते. 19 मे रोजी त्यांचा हा नियोजित दौरा होता. पण आता त्यांनी हा दौरा पुढे ढकलल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सच्या यांच्या पाकिस्ताना भेटीवर भाष्य करताना, परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की इस्लामाबाद आणि रियाध यांच्यातील कार्यक्रम निश्चित होताच त्याचा तपशील सार्वजनिक केला जाईल. पाकिस्तानची जनता सौदी अरेबियाच्या नेत्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
मार्चमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आता पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंध आणखी दृढ करण्यासाठी तसेच राजनैतिक आणि व्यापार आणखी वाढवण्यासाठी चर्चा होणार होती. पण सौदी अरेबियाच्या क्राऊन प्रिन्सची भेट आता लांबणीवर गेली आहे. पाकिस्तानात रोखीचा तुटवडा आहे. पाकिस्तानसाठी त्यांचा दौरा खूप महत्त्वाचा आहे.
पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे. पाच वर्षांतील मोहम्मद बिन सलमान यांचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा होता. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजवटीत फेब्रुवारी २०१९ मध्ये ते पाकिस्तानला आले होते. ते 2022 मध्ये पाकिस्तानला भेट देणार होते, परंतु शेवटच्या क्षणी हा दौरा रद्द करण्यात आला होता. पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये मजबूत व्यापारी, संरक्षण आणि सांस्कृतिक संबंध आहेत. सौदी अरेबियामध्ये जवळपास 27 लाख पाकिस्तानी प्रवासी राहतात.