Omicron : दक्षिण आफ्रिकेत लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण वाढलं, ओमिक्रॉनची जगभरात धास्ती
ओमिक्रॉनच्या उदयानंतर आलेल्या चौथ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगानं होत आहे. हॉस्पिटलमधील कोरोनाबाधितांमध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 0 ते 5 वयोगटातील मुलांच्या बाधितांचं प्रमाण समान असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलंय.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेला कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंटमुळे ओमिक्रॉनचा वेगानं संसर्ग होत आहे. ओमिक्रॉनच्या उदयानंतर लहान मुलांना कोरोना होणाचं प्रमाण वाढलंय. दक्षिण आफ्रिकेत या आधीच्या कोरोनालाटेत लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण अत्यंत नगण्य होतं. मात्र, आता ओमिक्रॉनच्या उदयानंतर आलेल्या चौथ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगानं होत आहे. हॉस्पिटलमधील कोरोनाबाधितांमध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 0 ते 5 वयोगटातील मुलांच्या बाधितांचं प्रमाण समान असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलंय. मुलांमध्ये आणि गरोदर महिलांमध्ये कोरोना होण्याचं प्रमाण का वाढत आह? याचा अभ्यास केलं जाणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय.
ओमिक्रॉनच्या उदयानंतर कोरोनाचा प्रसार वाढला
दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनच्या उदयानंतर 9 पैकी सात राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या प्रमाणात वाढ झालीय. कोरोनाबाधितांमध्ये लसीकरण न झालेल्याचं प्रमाण जास्त असल्यानं लसीकरणाला वेग आलाय. सध्य दक्षिण आफ्रिकेत ख्रिसमसच्या सुट्या असल्यानं लसीकरणाची मोहीम तीव्र करण्यात आलीय. आफ्रिकेतील झांबिया आणि उत्तर अमेरिकेतील मेक्सिको या देशामध्येही ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आलाय.
ओमिक्रॉनचा 40 देशांत शिरकाव
जगभरात 40 देशांत ओमिक्रॉनचा शिरकाव झालाय. अवघ्या दोन दिवसांत 23 देशांत संसर्ग परसरला आहे. ओमिक्रॉनमुळे अद्याप एकाही मृत्यूची नोंद नाही. 1 ओमिक्रॉनमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक देशांमध्ये ख्रिसमस बाजारही बंद करण्यात आलेत. आता ओमिक्रॉनमुळे नव वर्षाच्या स्वागताच्या उत्साहावर देखील विघ्न आलंय. ब्राझीलमधील रिओ दि जेनेरियो या शहरात 31 डिसेंबरच्या उत्सव रद्द करण्यात आलाय. अमेरिकेतही ओमिक्रॉनचा संसर्ग वेगानं वाढत आहे. न्यूयॉर्कमध्ये आणखीन तीन ओमिकॉनबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आता अमेरिकेत येणाऱ्या सर्वच प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आलीय.
युरोपात डेल्टा व्हेरियंटनं हाहा:कार माजवला
युरोपात कोरोनाचा डेल्टा व्हेरियंटनं हाहा:कार माजवला असतानाच आता ओमिक्रॉननं धास्ती वाढवलीय. बेल्जियममध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढल्यानं हॉस्पिटलमध्ये बेड मिळणंही अवघड झालंय. कोरोनाचा संसर्ग मुलांमध्ये होऊ नये यासाठी नवे निर्बंध जारी करण्यात आलेत.. यापुढे सहा वर्षांवरील सर्वच मुलांना मास्क घाललं बंधनकारक करण्यात आलंय. 20 डिसेंबरपासून बालवाडी आणि प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. माध्यमिक शाळाही एकदिवस आड सुरू राहणार आहेत.
ऑस्ट्रियात पुन्हा पूर्ण लॉकडाऊन
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युरोपमधील ऑस्ट्रिया या देशात पहिल्यांदा पूर्ण लॉकडाऊन आला. तर नेदरलँडमध्ये अशत: लॉकडाऊन लावण्यात आला . आता लॉकडाऊनच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यासाठी लसीकरण बंधनकारक केल्यानं स्पेनमधील नागरिक संतप्त झालेत. इटलीत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं नागरिकांना मास्क बंधनकारक करण्यात आलंय. नागरिकांनी मास्क घातलं की नाही याबाबत तपासणी करण्यात येत आहे. तर ब्रिटनमध्ये अवघ्या काही दिवसांत ओमिक्रॉनबाधितांची संख्या 160 वर पोहचलीय. परदेशातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांना कोरोना चाचणी आणि विलगीकरण बंधनकारक करण्यात आलंय. परदेशातून आलेल्या प्रवाशांना विलगीकरणासाठी हॉटेलही मिळत नसल्यानं गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीय. जर्मनीमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 378 रुग्णांचा मृत्यू झालाय. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आलंय. लसीकरण न झालेल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी आहे. या निर्बंधाचं स्वागत जर्मनमधील नागरिकांनी केलंय. जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी असं आवाहनही मावळत्या चॉन्सलर अँजिला मर्केल यांनी केलंय. जर्मनीमध्ये निर्बंधाचं स्वागत होत असताना ऑस्ट्रेलियामध्ये लससमर्थक आणि विरोधकांनी रॅली काढत आमने-सामने आलेत.
रशियामध्येही कोरोनाचा विस्फोट
रशियामध्येही कोरोनाचा विस्फोट झालाय. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 32,974 रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,215 कोरोनाबळी गेले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कोरोना चाचणी आणि 14 दिवसांचं विलगीकरण बंधनकारक करण्यात आलंय कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनची जगभरातच धास्ती आहे. भारतातही पाच रुग्ण सापडले आहेत. अशा या भीतीच्या वातावरणात WHO ने मोठा दिलासा दिला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा 40 देशांत प्रसार झाला असला तरीही या व्हेरिअंटमुळे अद्याप एकही मृत्यू झालेला नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्ह्टंलय. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.