भारत आणि पाकिस्तानला मनोमनी जोडण्याचा प्रयत्न करणारा दुवा हरपला, लेखक तारिक फतेह यांचं निधन
भारत आणि पाकिस्तानला मनोमनी जोडण्याचा प्रयत्न करणारा दुवा हरपला आहे. ज्येष्ठ लेखक तारिक फतेह यांचं निधन झालं आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. तारिक स्वत:ला भारतीय मानायचे. त्यांनी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकच संस्कृती असल्याचे विचार मांडले आहेत.
ओट्टावा (कॅनडा) : पाकिस्तानी वंशाचे ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार तारिक फतेह यांचं निधन झालं आहे. ते 73 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आज त्यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. तारिक यांच्या कन्या नताशा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यानंतर जगभरात तारिक यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. “पंजाबचा वाघ, हिंदुस्तानचा मुलगा, कॅनडाचा प्रेमी, सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालणाऱ्या योद्ध्याचं निधन झालंय. त्यांची क्रांती त्या लोकांना प्ररेणा देत राहील जे त्यांना ओळखतात आणि प्रेम करतात”, असं नताशा आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.
तारिक फतेह यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1949 ला पाकिस्तानातील कराची येथे झाला होता. त्यांचं कुटुंब हे मुंबईत राहायचं. पण फाळणीनंतर त्यांचं कुटुंब कराचीला गेलं होतं. तारिक यांनी कराची विद्यापीठात बायोकेमिस्ट्रीचं शिक्षण घेतलं. पण नंतर ते पत्रकारितेत आले. ते गेल्या अनेक वर्षांपासून कॅनडामध्ये वास्तव्यास होते. त्याआधी त्यांनी 1970 मध्ये कराचीतील सन नावाच्या वृत्तपत्रासाठी काम केलं. त्यांना या दरम्यान दोनवेळा जेलमध्ये जावं लागलेलं. त्यानंतर त्यांनी पाकिस्तान देशाला रामराम ठोकला होता.
तारिक फतेह हे 1987 साली कॅनडा येथे आले. त्यानंतर ते तिथेच स्थायिक झाले. त्यांनी पत्रकारितेत आपलं करियर सुरु केलं. त्यांनी स्तंभलेखन केलं. तसेच रेडिओ आणि टीव्हीतही त्यांनी काम केलं. त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
Lion of Punjab. Son of Hindustan. Lover of Canada. Speaker of truth. Fighter for justice. Voice of the down-trodden, underdogs, and the oppressed.@TarekFatah has passed the baton on… his revolution will continue with all who knew and loved him.
Will you join us?
1949-2023 pic.twitter.com/j0wIi7cOBF
— Natasha Fatah (@NatashaFatah) April 24, 2023
पाकिस्तानला भारतीय संस्कृतीचाच एक भाग मानायचे
तारिक फतेह स्वत:ला भारतीय असल्याचे म्हणायचे. तसेच पाकिस्तानला भारतीय संस्कृतीचाच एक भाग असल्याचं म्हणायचे. भारताच्या विभाजनाला ते चुकीचं असल्याचं म्हणत दोन्ही देशांची एकच संस्कृती असल्याचं ते सांगायचे. ते धार्मिक कट्टरतेचा विरोध करायचे. ते भारतीय संस्कृतीचं कौतुक करायचे. तसेच भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांना एकत्र जोडण्याचे विचार मांडायचे.
तारिक फतेह यांना हिंदी, इंग्रजी, उर्दू, पंजाबी आणि अरबी भाषेचं ज्ञान होतं. त्यांना त्या भाषा अवगत होत्या. तसेच त्यांना मानवी हक्कांचे कार्यकर्तेदेखील मानलं जायचं. ते अनेकदा भारतीय टीव्ही चॅनल्सच्या चर्चासत्रांमध्ये सहभागी होताना दिसायचे. तसेच ते पाकिस्तानातील बलुचिस्तानात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचे समर्थन करायचे. तसेच ते पाकिस्तानात घडणाऱ्या अनेक घडामोडींवर रोखठोक मत मांडायचे.