किंगमेकर नाही किंग व्हायचंय, पाकिस्तानच्या पंतप्रधानपदासाठी कोणाचं नाव चर्चेत?
Pakistan election result 2024 : पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्यानंतर आता निकाल ही लागला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शतक ठोकल्यानंतर ही मॅच गमवण्याची वेळ आली आहे. कारण ते बहुमताच्या आकड्यापासून लांब आहेत. दुसरीकडे आणखी दोन नाव चर्चेत आहेत.
Pakistan election Result : पाकिस्तानमध्ये अखेर निवडणुकीचे अंतिम निकाल समोर आलेत. पाकिस्तानच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्तेत येण्यासाठी तिन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ता मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरुये. इम्रान खान यांच्या समर्थनार्थ एकीकडे वातावरण तयार होत असताना दुसरीकडे नवाझ शरीफ यांचे भाऊ इतर पक्षांसोबत चर्चा करत आहेत. पाकिस्तानच्या या राजकीय समीकरणात बिलावल भुट्टो किंगमेकरची भूमिका बजावू शकतात. पण बिलावल भुट्टो यांना किंगमेकरऐवजी राजाची होण्याची इच्छा असल्याचं बोललं जात आहे.
दुसरीकडे निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप देखील सुरु आहे. इम्रान खान यांचे कार्यकर्ते अनेक भागांत निदर्शने करत आहेत. त्यामुळे तणावाचे वातारवण तयार होऊ शकते.पाकिस्तानातच गृहयुद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन देखील या परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. इमरान खान यांचे समर्थक रस्त्यावर उतरु शकतात.
सरकार स्थापन करण्यासाठी 133 जागांची आवश्यकता आहे
पाकिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 133 जागांची गरज आहे. नॅशनल असेंब्लीच्या 336 जागांपैकी फक्त 266 जागांवर मतदान घेण्यात आले आहे. 60 जागा या महिलांसाठी राखीव आहेत तर 10 अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत. त्यामुळे 265 पैकी 133 जागा ज्यांच्याकडे आहेत त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी मिळू शकते.
कोण होणार पंतप्रधान
पाकिस्तानतील राजकीय परिस्थिती अशी आहे की, शतक ठोकल्यानंतर ही इम्रान खान यांचा पराभव झाल्यासारखी आहे. नवाज शरीफ यांचा पक्ष मुस्लीम लीग आणि बिलावल यांचा पक्ष पीपल्स पार्टी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. पण पंतप्रधानपद कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बिलावल भुट्टो यांना किंगमेकरऐवजी राजा व्हायचं आहे. त्यामुळे आता लष्कर प्रमुखांच्या मनात काय आहे हे देखील महत्त्वाचे आहे, कारण पंतप्रधानपदाबाबत त्यांची भूमिका देखील महत्त्वाची असते. लष्कराच्या मनात सध्या नवाझ शरीफ असल्याचं बोललं जातंय.
आता सरकार स्थापनेचे गणित काय?
कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांनी 101 जागा जिंकल्या आहेत. तीन वेळा माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) 75 जिंकल्या आहेत. तर बिलावल झरदारी भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना ५४ जागा मिळाल्या आहेत, तर मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तानला १७ जागा मिळाल्या आहेत.