पाकिस्तानात हाय व्होल्टेज ड्रामा, इम्रान खान यांच्या घरावर चालले बुलडोजर
पाकिस्तानातील परिस्थिती गंभीर झाली आहे. तोशाखाना प्रकरणात कोर्टात हजर राहण्यासाठी इम्रान खान आपल्या कार्यकर्त्यांसह रवाना झाले. त्याचवेळी पंजाब पोलिसांनी इम्रानच्या घराबर बुलडोझर चालवल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. यामुळे पाकिस्तानातील राजकारण पेटणार आहे.
लाहोर : पाकिस्तानातील (Pakistan) परिस्थिती सतत बिघडत चालली आहे.पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खानच्या अटकेवरुन सध्या हाय होल्टेज ड्रामा सुरू आहे. तोशाखाना प्रकरणात कोर्टात हजर राहण्यासाठी इम्रान खान आपल्या कार्यकर्त्यांसह इस्लामाबादला लाहोर येथील निवासस्थानावरून निघाले. त्याचवेळी पंजाब पोलिसांनी इम्रानच्या घराबर बुलडोझर चालवल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. यावेळी समर्थकांनी विरोध केला असता २० जणांना अटक करण्यात आली.
It is now clear that, despite my having gotten bail in all my cases, the PDM govt intends to arrest me. Despite knowing their malafide intentions, I am proceeding to Islamabad & the court bec I believe in rule of law. But ill intent of this cabal of crooks shd be clear to all.
हे सुद्धा वाचा— Imran Khan (@ImranKhanPTI) March 18, 2023
पोलिसांच्या कारवाईवर इम्रान खान संतापले आहे . त्यांनी म्हटले की, माझ्या घरी पत्नी बुशरा बेगम एकटीच आहे. मी घरात नसताना पोलीस कोणत्या कायद्याखाली ही मोहीम राबवत आहेत? हा लंडन योजनेचा एक भाग आहे, जिथे फरार असलेले नवाझ शरीफ यांना सत्तेत आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. मला निवडणूक प्रचारापासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.
या घटनेनंतर इम्रान खान यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “सर्व प्रकरणांमध्ये जामीन मिळाल्यानंतरही पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) आघाडी सरकार मला अटक करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु माझा कायद्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी स्वत:हून न्यायालयात जात आहे. सरकारचा मला तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न आहे. ज्यामुळे मी निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करू शकत नाही.
काय आहे प्रकरण
तोशाखाना प्रकरणात एका महिला न्यायाधीशाला धमकावल्याबद्दल आणि कोर्टात हजर न राहिल्याबद्दल इम्रान खानविरोधात दोन अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याच्यावर अनेक दिवसांपासून अटकेची टांगती तलवार आहे. यापूर्वी इस्लामाबाद पोलीस हेलिकॉप्टरमधून इम्रानला अटक करण्यासाठी पोहोचले होते. पण अत्यंत हुशारीने इम्रानने घरही सोडले आणि थेट रॅलीला संबोधित करण्यासाठी गेले. समर्थकांच्या गर्दीत इम्रानला पकडणेही पोलिसांना अवघड झाले आहे.
कोणत्या प्रकरणात अटक होणार
सत्ताधारी पाकिस्तानी डेमोक्रेटिक मूवमेंटने निवडणूक आयोगाकडे तोशाखाना भेट प्रकरण उचलले होते. इम्रानने आपल्या कार्यकाळात विविध देशांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची विक्री केल्याचे सांगण्यात आले. इम्रानने निवडणूक आयोगाला सांगितले होते की, त्याने या सर्व भेटवस्तू तोशाखान्यातून 2.15 कोटी रुपयांना विकत घेतल्या होत्या, त्यानंतर त्याची विक्री केल्यावर 5.8 कोटी रुपये मिळाले. परंतु तपासात ही रक्कम 20 कोटींहून अधिक असल्याचे उघड झाले.