अतिरेक्यांचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तान आता त्यांनी रचलेल्या सापळ्यात अडकला आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रातांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्यात 38 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. खैबर पख्तुनख्वामधील डाऊन कुर्रम भागात प्रवासी व्हॅनवर हा हल्ला झाला. या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी आणि महिलांसह डझनभर लोक जखमी झाले आहेत.
एएफपीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. ही प्रवासी व्हॅन लोअर कुर्रममधील ओचुट काली आणि मंदुरी या भागातून जात होती. त्या ठिकाणी आधीच लपलेल्या अतिरेक्यांनी व्हॅन येताच त्यावर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यानंतर व्हॅनमधील प्रवाश्याच्या आक्रोशाने हा परिसर हादरला. ही प्रवाशी व्हॅन पाराचिनारमधून पेशावर जात होती. पाकिस्तानची वृत्तसंस्था डॉनने दिलेल्या माहितीनुसार, तहसील मुख्यालय रुग्णालय अलिझाईचे अधिकारी डॉ.घायोर हुसैन यांनी हल्ल्याला दुजोरा दिला आहे.
हल्लातील जखमींना जवळपासच्या विविध रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच काही गंभीर रुग्णांना पेशावरला पाठवण्यात आले आहे. दरम्यान पाकिस्तान प्रशासनामधील अधिकारी नदीम अस्लम चौधरी यांनी रॉयटर्सला सांगितले की, मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आणि मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान पाकिस्तान पीपल्स पार्टीने या हल्ल्यात निर्दोष प्रवाशांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्याची मागणी केली आहे.
पख्तूनख्वा प्रांताचे मुख्य सचिव नदीम असलम चौधरी यांनी सांगितले की हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात एक महिला आणि दोन मुलांचाही मृत्यू झाला आहे. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणीच घेतली नाही.