Bangladesh Crisis : इंधनाचे दर अचानक 50 टक्क्याने वाढवले, आर्थिक संकटामुळे बांगलादेशींचं रस्त्यावर ‘तांडव’; आता बांगलादेशही श्रीलंकेच्या वाटेवर
Bangladesh Crisis : रशिया आणि युक्रेनचं युद्ध तसेच कोरोनामुळे तेलाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे बांगलादेशात पेट्रोलच्या दरात 51 तर डिझेलच्या दरात 42 टक्के वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेनचं युद्धामुळे मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण बिघडलं.
ढाका : श्रीलंकेपाठोपाठ (sri lanka) आता बांगलादेशालाही (Bangladesh Crisis) आर्थिक संकटाने घेरले आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बांगलादेश सरकारने पेट्रोलच्या (petrol price) दरात 50 टक्क्याने वाढ केली आहे. बांगलादेशाच्या निर्मितीनंतरचीही सर्वात मोठी दरवाढ आहे. त्यामुळे लोक संतापले असून लोकांनी रस्त्यावर उतरून तांडव करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बांगलादेशात श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या महागाईच्याविरोधात बांगलादेशी नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. देशातील अनेक शहरात निदर्शने सुरू आहेत. संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य केलं आहे. बांगलादेशातील जनता ज्या पद्धतीने प्रक्षुब्ध झाली आहे, त्यावरून बांगलादेशातील स्थिती अधिकच बिघडण्याची चिन्हे दिसत आहेत. तर दुसरीकडे बांगलादेशाच्या अर्थमंत्र्यांनी जागतिक नाणे निधीकडे 4.5 अब्ज डॉलरचं 450 कोटीचं कर्ज मागितलं आहे.
एवढेच नव्हे तर बांगलादेशाची आर्थिक स्थिती बिघडल्याने बांगलादेशात इतर देशातून येत असलेला तेल पुरवठाही बाधित झाला आहे. त्यामुळे डिझेलवर चालणाऱ्या पॉवर प्लांटला टाळा लागला आहे. देशातील केंद्रीय बँकांच्या खजानामध्येही प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे अनेक वस्तूंच्या आयातींवर बंदी घालण्यात आली आहे.
आयात वाढली, निर्यात घटली
बांगलादेशातील आर्थिक स्थिती बिघडण्याचे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आयातीत झालेली वाढ आणि निर्यातीत झालेली घट. केंद्रीय बँकांच्या अहवालातही तसे नमूद करण्यात आलं आहे. आयात वाढल्याने त्याचा देशाच्या तिजोरीला फटका बसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या अहवालानुसार, जुलै 2021 पासून मे 2022च्या दरम्यान 81.5 अब्ज डॉलरची आयात करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही आयात 39 टक्क्याने वाढली आहे.
आयातीवर अधिक खर्च
बांगलादेशाने दुसऱ्या देशातून सामान मागवण्यात अधिक पैसा खर्च केला आहे. तसेच आपल्या देशातील निर्यात कमी केली आहे. त्यामुळे बांगलादेशाला घाटा झाला आहे. आयात निर्यातीबाबतचं नियोजन नसल्यामुळे बांगलादेशावर ही परिस्थिती ओढावल्याचं सांगितलं जात आहे.
वर्षभरात विदेशी मुद्रा भंडारला फटका
मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही वर्षापासून विदेशात काम करणाऱ्या बांगलादेशींच्या उत्पन्नातही घट झाली आहे. विदेशी मुद्रा भंडारमध्ये घट येण्याचं हे ही एक कारण आहे. त्यातच आयातीचा मारा करण्यात आल्याने देशाची स्थिती अधिकच डबघाईला आली आहे. विदेशी मुद्रा भंडाराच्या आकड्यानुसार विदेशी मुद्रा भंडारात गेल्या वर्षी जुलैपर्यंत 45 अब्ज डॉलर होते. आता जुलैमध्ये हा आकडा कमी होऊन 39 अब्ज डॉलर झाला आहे.
रशिया आणि युक्रेनचं युद्ध तसेच कोरोनामुळे तेलाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे बांगलादेशात पेट्रोलच्या दरात 51 तर डिझेलच्या दरात 42 टक्के वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेनचं युद्धामुळे मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण बिघडलं. तसेच कोरोनामुळे ओपेक देशांनी तेलाचा पुरवठा बंद केला. त्यामुळे देशभरात त्याचा परिणाम जाणवला. बांगलादेशही त्याला अपवाद राहिला नाही. मात्र, अचानक इंधनाचे दर वाढल्याने बांगलादेशातील जनता संतप्त झाली असून त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं आहे.