‘भारत-युएई दोस्ती जिंदाबाद, मला हा क्षण जगून घ्यायचाय’, मोदी अबूधाबीत भारतीयांचा उत्साह पाहून भारावले
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या यूएई देशाच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी आज अबूधाबीत भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी भारतीयांचा उत्साह पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारावले. मोदींनी मनमोकळेपणाने आपलं मत यावेळी मांडलं. तुमचा भारताला अभिमान आहे, असं मोदी अबूधाबीतल्या भारतीयांना उद्देशून म्हणाले.
अबूधाबी | 13 फेब्रुवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या यूएई देशाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा अबूधाबीत स्वागताचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमात त्यांनी लाखो भारतीयांना संवाद साधला. अबूधाबीत ‘अहलान मोदी’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अबूधाबीच्या जायद स्टेडियमवर मोदींनी भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांचं करण्यात आलेलं स्वागत पाहून मोदी भारावले. “अबूधाबीत तुम्ही नवा इतिहास रचला आहे. तुम्ही युएईच्या कानाकोपऱ्यातून आला आहात. तसेच भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधून आला आहात. पण प्रत्येकाचं मन जोडलं गेलं आहे. या ऐतिहासिक स्टेडियममध्ये प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके हे भारत-युएई दोस्ती जिंदाबाद असं म्हणत आहे. प्रत्येक श्वास सांगतोय, भारत-युएई दोस्ती जिंदाबाद. प्रत्येक आवाज तेच म्हणत आहेत. मला फक्त या क्षणांना जगून घ्यायचं आहे. मनोसक्तपणे हा क्षण जगून घ्यायचं आहे. आज त्या आठवणी साठवून घ्यायच्या आहेत ज्या आयुष्यभर आपल्यासोबत राहणार आहेत”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“मी आज आपल्या परिवाराच्या सदस्यांना भेटायला आलो आहे. समुद्रापार ज्या देशाच्या मातीत तुमचा जन्म झालाय, मी त्या मातीचा सुगंध सोबत घेऊन आलो आहे. मी आपल्या 140 भारतीय बंधू-भगिनींचा निरोप घेऊन आलोय की, भारताला आपला गर्व वाटतो. तुम्ही भारताचा गौरव आहात. तुमचा उत्साह, तुमचा आवाज आज अबूधाबीच्या आकाशाच्या पार जात आहे. माझ्यासाठी इतका स्नेह आणि आशीर्वाद हे अद्भूत करणारं आहे. तुम्ही वेळ काढून इथे आलात मी आपला खूप आभारी आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
मोदींकडून यूएईच्या राष्ट्रपतींचं कौतुक
“मला 2015 चा पहिला दौरा लक्षात आहे, त्यावेळी मला केंद्र सरकारमध्ये येऊन फार वेळ झाला नव्हता. तीन दशकांनंतर कुठल्या भारतीय पंतप्रधानाची हा पहिला युएई दौरा होता. माझ्यासाठी डिप्लोमसीची दुनियासुद्धा नवी होती. तेव्हा विमानतळावर माझं स्वागत करण्यासाठी युएईचे राष्ट्रपती आपल्या पाच भावांसोबत आले होते. त्यांच्या डोळ्यांमधील चमक मी कधीच विसरु शकत नाही. त्या पहिल्या भेटीतच मला असं वाटलं की मी माझ्या खूप जवळच्या व्यक्तीच्या घरी आलो. तेसुद्धा कुटुंबियासारखं माझा सत्कार करत होते. तो सत्कार हा फक्त माझा नव्हता तर 140 कोटी भारतीयांता होता. तो सत्कार इथे युएईत राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाचा होता”, असं मोदी म्हणाले.
“एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस आहे. माझा हा युएईचा सातवा दौरा आहे. युएईचे राष्ट्रपती आजही विमानतळावर माझ्या स्वागतासाठी आले होते. त्यांची आपुलकी तीच होती. हीच गोष्ट त्यांना खास बनवते. मला आनंद आहे की, आम्हालाही चार वेळा भारतात त्यांचं स्वागत करण्याची संधी मिळाली. काही दिवसांपूर्वीच ते गुजरातला आले होते. तेव्हा तिथे लाखो नागरीक त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहीले होते. आभार कशासाठी? तर ते ज्याप्रकारे युएई आपल्याकडे लक्ष देत आहेत, आपल्या हिताची चिंता करत आहेत”, असा दावा मोदींनी केला.