लाहोर: पाकिस्तानच्या (Pakistan) नॅशनल असेंबलीत उद्यापासून पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर (no-trust motion) चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज पाकिस्तानात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इमरान खान यांनी आज दुपारी नेत्यांची तातडीची बैठक बोलावल्याने इमरान खान आज पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, या चर्चा सुरू असतानाच क्रिकेटपटू राहिलेल्या इमरान यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली. मी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळत राहणार असं इमरान यांनी स्पष्ट केलं. तर, दुसरीकडे पाकिस्तान आर्मीचे चीफ आणि आयएसआय या गुप्तचर संघटनेचे डीजी इमरान खान यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लगावले जात आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन इमरान यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
इमरान खान यांनी आज दुपारी अडीच वाजता सहकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर आता आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा हे इमरान खान यांच्या घरी पोहोचले आहेत. आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचे डीजीही इमरान यांच्या घरी पोहोचले आहेत. इमरान खान यांनी आज सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तसेच आजच संध्याकाळी 7.30 ते 8.30च्या दरम्यान ते पाकिस्तानी नागरिकांना संबोधित करण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे इमरान खान यांच्या या संबोधनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान या सर्व गदारोळात विरोधकांनीही आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन इमरान खान सरकारवर टीका केली. पाकिस्तान पिपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी यांनी एमक्यूएमचे खालिक मकबूल सिद्दिकी आणि पाकिस्तान नॅशनल असेंबलीचे एलओपी शहबाज शैरी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. 2018मध्ये निवडणुकीच्या काळात संपूर्ण पाकिस्तान विरोधात षडयंत्र रचण्यात आलं होतं, असं त्यांनी सांगितलं. तसेच जरदारी आणि इतर विरोधी पक्षनेत्यांनी इमरान खान यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. एकेकाळी एकमेकांना पाण्यात पाहणारे विरोधक आज मात्र, इमरान खान यांच्याविरोधात एकजूट होताना दिसले.
संबंधित बातम्या:
इम्रान खान सरकारची गच्छंती अटळ; अविश्वास ठरावापूर्वीच ‘एमक्यूएमने’ सरकारचा पाठिंबा काढला