पुतिन यांच्यसमोर पंतप्रधान मोदींनी पुन्हा दिला शांतीचा संदेश, पुतिन मोदींचं ऐकणार?
कझानमध्ये शिखर परिषदेच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शांततेचं आवाहन केले आहे.
ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी रशियाला पोहोचले. कझान येथे 16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलंय. कझानमध्ये शिखर परिषदेच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेतली. पीएम मोदींनी पुतीन यांच्याशी हस्तांदोलन केले आणि नंतर त्यांना मिठी मारली. मीडिया ब्रीफिंगदरम्यान पीएम मोदींनी रशिया-युक्रेन युद्धाचा पुन्हा उल्लेख केला आणि म्हटले की, पुतीन यांना पुन्हा एकदा शांततेचे आवाहन केले आहे. 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी कझान येथे BRICS शिखर परिषद होत आहे.
पंतप्रधान मोदींनी रशियाच्या आदरातिथ्याबद्दल आभार मानले. मोदी म्हणाले की, “कझान शहराशी भारताचे ऐतिहासिक संबंध आहेत. भारत येथे नवीन वाणिज्य दूतावास उघडत आहे. गेल्या काही महिन्यांत मी दुसऱ्यांदा रशियाला आलो आहे. मी या वर्षी जुलैमध्ये मॉस्कोमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली होती. ही उबदारता दोन्ही देशांमधील सखोल संबंध दर्शवते. भारत आणि रशियामधील संबंध आणखी घट्ट झाले आहेत.
रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा
पीएम मोदी म्हणाले, “रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत मी सतत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या संपर्कात आहे. भारताचा असा विश्वास आहे की, संघर्षाचे निराकरण शांततेत झाले पाहिजे. आम्ही शांतता आणि स्थिरतेसाठी प्रयत्न करतोय.” येणाऱ्या काळात मानवतेला प्राधान्य देण्याच्या आमच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा द्या.
#WATCH | Kazan: During his meeting with Russian President Vladimir Putin, PM Modi says, “I have been in constant touch with you on the subject of the ongoing conflict between Russia and Ukraine. As I have said earlier, we believe that the problems should be resolved in a peaceful… pic.twitter.com/YT8NwdNwMJ
— ANI (@ANI) October 22, 2024
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले, “मला आठवते की आम्ही जुलैमध्ये भेटलो होतो. तेव्हा अनेक मुद्द्यांवर खूप चांगली चर्चा झाली होती. आजही आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. आम्ही अनेक वेळा फोन केला. मी खूप आनंदी आहे. याबद्दल तुमचा आभारी आहे.”
व्लादिमीर पुतिन म्हणाले की, ‘आंतरसरकारी आयोगाची पुढील बैठक 12 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत होणार आहे. आमच्या संयुक्त प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी कझानमध्ये भारतीय वाणिज्य दूतावास उघडण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. भारताच्या धोरणांचा दोन्ही देशांमधील भागीदारी आणि संबंधांना फायदा होईल. तुम्हाला आणि तुमच्या शिष्टमंडळाला रशियामध्ये पाहून आम्हाला खूप आनंद झाला.