आणखी एका देशात बंडखोर उतरले रस्त्यावर, राष्ट्राध्यक्ष देश सोडून पळून गेल्याची चर्चा
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सध्या सीरियामध्ये असलेल्या सर्व भारतीयांना दमास्कसमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय, भारतीय लोकांनी शक्य तितक्या लवकर सीरिया सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष देश सोडून गेल्याचा दावा केला जात आहे.
Syria Row : बंडखोरांनी सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये मोठा हल्ला केलाय. त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे बिघडवली आहे. बंडखोरांनी दमास्कसमधील सिदानिया तुरुंगावर हल्ला केला, जिथे बशर असदचे अनेक विरोधक बंद होते. याशिवाय त्यांनी बशर असद यांच्या सैन्याचे रणगाडे देखील ताब्यात घेतले आहेत. त्यांनी हे रणगाडे राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्याच्या दिशेने वळवले आहेत. दमास्कसच्या रस्त्यावर सध्या लढाई सुरू आहे. ज्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. बशर सरकारच्या एका विमानाने राजधानीतून उड्डाण केल्याचा दावा देखील माध्यमांनी केला आहे. या विमानात कोण होते याची माहिती अजून समोर आलेली नाही. बशर असद देश सोडून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सीरियामध्ये बंडखोरांनी मोठे हल्ले करत सरकारच्या नियंत्रणाखालील अनेक भाग ताब्यात घेतला आहे. स्थानिक मीडिया असा दावा आहे की, बंडखोरांनी दमास्कसला वेढा घालण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इस्लामिक संघटनेचा कमांडर हसन अब्देल घनी याने सांगितले की, त्यांचे सैन्य राजधानीला वेढा घालण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.
तुर्कस्तान आणि इराणने सीरियातील सर्व लष्करी कारवाया थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. बंडखोरांनी दमास्कसमध्ये आपला विजय साजरा करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियातील परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, अमेरिकेला याच्याशी काही देणेघेणे नाही. त्यांनी सीरियापासून दूर राहावे.
Travel advisory for Syria:https://t.co/bOnSP3tS03 pic.twitter.com/zg1AH7n6RB
— Randhir Jaiswal (@MEAIndia) December 6, 2024
सीरियातील बिघडलेल्या परिस्थितीबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे. भारत सरकारने सर्व भारतीय नागरिकांना रात्री उशिरा एक सूचना जारी केली आहे. सीरियाला जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सध्या सीरियामध्ये असलेल्या सर्व भारतीयांना दमास्कसमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी शक्य तितक्या लवकर सीरिया सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.