बांगलादेशात हिंदूवर दडपशाही सुरुच, इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना अटक
बांगलादेशमधील इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास प्रभू यांनी 22 नोव्हेंबर रोजी बांगलादेशातील रंगपूर येथे हिंदूंच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. त्याविरोधात चिन्मय कृष्ण प्रभू यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना विमानतळावर अटक करण्यात आली आहे.
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात बोलणारे इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना पोलिसांनी अटक केली आहे. चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना ढाका विमानतळावर ताब्यात घेण्यात आल्याचा दावा बांगलादेशी मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास प्रभू यांनी 22 नोव्हेंबर रोजी बांगलादेशातील रंगपूर येथे हिंदूंच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. त्यामुळे चिन्मय कृष्ण प्रभू यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या रॅलीत हिंदूंवरील हल्ल्यांचा निषेध करण्यात आला होता.
चौकात फडकवला भगवा ध्वज
25 ऑक्टोबर रोजी देखील त्यांच्या 8 कलमी मागण्यांबाबत रॅली काढण्यात आली होती. त्यादरम्यान काही लोकांनी न्यू मार्केट चौकातील आझादी स्तंभावर भगवा झेंडा फडकावला होता. या ध्वजावर आमी सनातनी असे लिहिले होते. याबाबत त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हिंदू मंदिरांच्या रक्षणासाठी आंदोलन
बांगलादेशात सत्ता संघर्षादरम्यान, 6 ऑगस्ट रोजी बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात इस्कॉन मंदिराला लक्ष्य करण्यात आले होते. यामध्ये भगवान जगन्नाथाच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली होती. या हल्ल्यानंतर चिन्मय दास यांनी चितगावमधील इतर तीन मंदिरांनाही धोका असल्याचे सांगितले होते. त्यांच्या संरक्षणासाठी हिंदू समाज एकत्रितपणे काम करत आहे. दास म्हणाले की, हिंसाचारापासून वाचण्यासाठी हिंदू त्रिपुरा आणि बंगालमध्ये आश्रय घेत आहेत. चिन्मय दास अनेक दिवसांपासून हिंदू मंदिरांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत आहेत.