UK PM Election : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक पुढे, तिसऱ्या फेरीतही आघाडी कायम!
ब्रिटनमधील निवडणुकीच्या या फेरीत ऋषी सुनक यांचे प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डाउंट 82 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचवेळी लिझ ट्रस 71 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय कॅमी बडेनोच 58 मतांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.
मुंबई : ब्रिटनमध्ये (Britain) पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक पुढे आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होण्याच्या अगदी जवळ आहेत. सोमवारी झालेल्या मतदानाच्या तिसऱ्या फेरीत ऋषी 115 मतांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पुढे आहेत. आज चौथ्या फेरीचे मतदान (Voting) होणार आहे. ब्रिटनमध्ये तिसऱ्या फेरीसाठी एकूण 357 मते पडली. आता फक्त चार विरोधक उरले आहेत. भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांना तिसऱ्या फेरीत 115 मते मिळाली, म्हणजे दुसऱ्या फेरीपेक्षा 14 मते जास्त मिळाली आहेत. त्यामुळेच आता ऋषी सुनक (Rishi Sunak) हे ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान असतील अशी चर्चा जगभर रंगू लागलीयं.
भारतीय वंशाचे ऋषी सुनक तिसऱ्या फेरीत आघाडीवर
ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाच्या दावेदारांच्या शर्यतीत तिसऱ्या फेरीतील विजयानंतर ऋषींनीही ब्रिटनला अधिक मजबूत बनवण्याबाबत म्हटले आहे की, एकत्रितपणे आपण आपली अर्थव्यवस्था पुन्हा उभारू शकतो. ब्रेक्झिट वाचवता येईल. ऋषी सुनक यांच्याशिवाय कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे तीन उमेदवार पेनी मॉर्डेंट, लिझ ट्रस आणि केमी बॅडेनोक अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत.
लिझ ट्रस 71 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर
ब्रिटनमधील निवडणुकीच्या या फेरीत ऋषी सुनक यांचे प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डाउंट 82 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचवेळी लिझ ट्रस 71 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय कॅमी बडेनोच 58 मतांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. या फेरीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेले टॉम तुगेंधत यांना केवळ 31 मते मिळाली.
ब्रिटनमधील निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष
गुरुवारपर्यंत केवळ दोनच उमेदवार रिंगणात राहणार आहेत. 5 सप्टेंबरपर्यंत, विजयी उमेदवार तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या जागी नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेईल. आता ब्रिटनमधील निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. जर या निवडणूकीमध्ये ऋषी सुनक हे पंतप्रधान झाले तर भारताला नक्कीच याचा फायदा होईल.