मॉस्को : रशियात स्पुटनिक व्ही (Sputnik V Vaccine) या कोरोना लसीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, रशिया सरकारने लसीबाबत नागरिकांना महत्त्वाची सूचना दिली आहे. ही सूचना मद्यप्रेमींसाठी निराश करणारी आहे. रशिया सरकारने देशातील नागरिकांना लस टोचल्यानंतर निदान दोन महिन्यांपर्यंत दारूपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे (Russia Government on Sputnik V Vaccine).
रशियाचे उपपंतप्रधान तातियाना गोलिकोवा (Tatiana Golikova) यांनी याबाबत सूचना दिली. गोलिकोवा यांनी TASS वृतसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कोरोना लस टोचल्यानंतर कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली. “स्पुटनिक व्ही लस टोचल्यानंतर सुरुवातीचे 42 दिवस अत्यंत सावधगिरी बाळगावी. लोकांनी दारूपासून लांब राहावं. इम्यूनोसप्रेसेन्ट ड्रग्स घेऊ नये”, असं आवाहन त्यांनी केलं.
“रशियाच्या नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. नागरिकांना चेहऱ्यावर नेहमी मास्क लावावं. सॅनेटायझरचा वापर करावा”, असंदेखील ते म्हणाले. दरम्यान, “जर आपल्याला निरोगी राहायचे असेल आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपण दारू पिऊ नये”, असं रशियाच्या एका अधिकाऱ्याने मॉस्को टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
रशिया जगातील सर्वात मोठं क्षेत्रफळ असलेला देश आहे. मात्र, तरीदेखील लोकसंख्येच्या बाबतीत हा देश 9व्या क्रमांकावर आहे. या देशातील मद्यप्रेमींची संख्यादेखील मोठी आहे. दारूच्या मागणीत रशियाचा जगात चौथा क्रमांक लागतो. त्यामुळे कोरोना लसीबाबत देण्यात आलेली सूचना रशियाच्या नागरिकांसाठी नाराज करणारी आहे.
रशियात लसीकरण सुरु
रशियाची राजधानी असलेल्या मॉस्को शहरात गेल्या आठवड्यात लसीकरणाला सुरुवात झाली. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियात आतापर्यंत 1 लाख लोकांना लस टोचण्यात आली आहे. स्पुटनिक व्ही ही लस 90 टक्के प्रभावशाली असल्याचा दावा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा :
Rajesh Tope | कोरोना लसीकरणाच्या नियोजनात महाराष्ट्र नंबर एकवर : राजेश टोपे
Corona Vaccine | केंद्राचा कोरोना लसीकरणाचा प्लॅन तयार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती