Vladimar Putin: भारत-रशिया AK-203 करारावर स्वाक्षरी, पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यात काय चर्चा होणार?
भारत आणि रशिया यांच्यातील लष्करी संबंधांना मोठी चालना मिळणार आहे. व्लादिमीर पुतिन यांच्या दिल्ली भेटीदरम्यान 7.5 लाख AK-203 असॉल्ट रायफल्सचा पुरवठा करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये करार करण्यात येणार आहे. सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या अंतिम मंजुरीसह सर्व आवश्यक मंजुरी घेण्यात आल्या आहेत.
नवी दिल्लीः रशियाचे अध्यक्ष व्लादिमार पुतिन (Vladimar Putin) येत्या सोमवारी भारत दौऱ्यावर येणार आहेत. व्लादिमार पुतिन 6 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत 21 व्या भारत-रशिया (Indo-Russia Summit) वार्षिक शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीला अधिकृत भेट देतील. नोव्हेंबर 2019 मध्ये ब्राझिलिया येथे झालेल्या BRICS शिखर परिषदेदरम्यान झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिली थेट भेट असेल. 2020 ची भारत-रशिया वार्षिक शिखर परिषद कोविड महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. या दोन प्रमुख नेत्यांमधील बैठक जागतीक पातळीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, विशेषत: अलीकडच्या भारत-चीन (India-China) संघर्षाच्या पार्श्वभूमीवर.
लष्करी संबंधांना मोठी चालना मिळणार
पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमार पुतिन यांची ज्या आंतरराष्ट्रीय विषयावर चर्चा होईल त्यात, G20, BRICS आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमधील (Shanghai Cooperation Organisation) संयुक्त कार्याचा समावेश असेल. याशिवाय भारत आणि रशिया यांच्यातील लष्करी संबंधांना मोठी चालना मिळणार आहे. व्लादिमीर पुतिन यांच्या दिल्ली भेटीदरम्यान 7.5 लाख AK-203 असॉल्ट रायफल्सचा पुरवठा करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये करार करण्यात येणार आहे. सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या अंतिम मंजुरीसह सर्व आवश्यक मंजुरी घेण्यात आल्या आहेत. सोमवारी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीदरम्यान त्यावर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती मिळतेय.
रशियाने डिझाइन केलेले AK-203 अमेठी, उत्तर प्रदेश येथील कारखान्यात बनवले जात आहे. काही वर्षांपूर्वी हा करार झाला होता आणि आता शेवटचा मोठा मुद्दा तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाचा आहे, असे सूत्रांनी सांगितले. पुतिन आणि मोदी यांच्या भेटीदरम्यान S-400 हवाई संरक्षण प्रणालीचे सादरीकरण होण्याची शक्यता आहे. इग्ला शोल्डर फायर्ड एअर डिफेन्स सिस्टिमवरही काम सुरू आहे, ज्याची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे.
भविष्यातील द्विपक्षीय संबंध आणि चीन संघर्ष
याशिवाय दोन्ही देशांमधील भविष्यातील द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा होईल. कोविड महामारी सुरू झाल्यापासून रशियन अध्यक्ष वैयक्तिकरित्या द्विपक्षीय बैठकीसाठी परदेशात जात असल्याची ही पहिलीच वेळ आहे. रशिया-भारत-चीन यांच्यात नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय बैठकीनंतर पुतिन यांचा भारत दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये हिवाळी ऑलिम्पिकसाठी पुतिन बीजिंग, चीनला जाण्याची शक्यता आहे – तर दुसऱ्या बाजूचे अमेरिकन अध्यक्ष जो बिडेन यांचा बीजिंग ऑलिम्पिकवर अधिकृत बहिष्कार आहे. अशा परिस्थितीत भारत काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे आहे. अरुणाचल प्रदेशात LAC सीमेवर चिनी गाव बांधल्याच्या अलीकडच्या बातम्यांनंतर भारताचा चीनसोबतचा तणाव वाढला आहे.
इतर बातम्या