10 हजार सैन्य पाठवल्याने रिटर्न गिफ्ट म्हणून रशियाने उत्तर कोरियाला पाठवले हे प्राणी
रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांनी उत्तर कोरियाशी आपली मैत्री सतत दृढ केली आहे. अलीकडच्या काही दिवसांत, रशियाने मॉस्को प्राणीसंग्रहालयातून 1 आफ्रिकन सिंह आणि 2 तपकिरी अस्वलांसह 70 हून अधिक प्राणी उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथील प्राणीसंग्रहालयात हस्तांतरित केले आहेत. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
उत्तर कोरिया आणि रशिया यांच्यात घट्ट मैत्री दिसतेय. रशियाचे राष्ट्राध्य़क्ष पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाचा दौरा केला होता. रशियाने आता प्राण्यांचा माध्यम म्हणून वापर केलाय. उत्तर कोरियासोबतच्या मैत्रीला नवी ओळख देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. यामुळेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतेच उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांना काही भेटवस्तू पाठवल्या आहेत.
रशियाने पाठवलेल्या भेटवस्तू या सामान्य नाहीत. त्यांनी भेट म्हणून उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांना सिंह, अस्वल, बदक यांच्यासह अनेक प्राणी पाठवले आहेत. हे प्राणी विमानाने मॉस्कोहून उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे नेण्यात आले. उत्तर कोरियाने अलीकडेच रशियन सैन्याला बळ देण्यासाठी 10,000 सैनिक पाठवले आहेत. रशियाने सैनिकांच्या बदल्यात उत्तर कोरियाला या भेटवस्तू पाठवल्याचं बोललं जातंय.
वृत्तानुसार, रशियन सरकारने मॉस्को प्राणीसंग्रहालयातून एक आफ्रिकन सिंह आणि दोन तपकिरी अस्वलांसह 70 हून अधिक प्राणी उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमधील प्राणीसंग्रहालयात हस्तांतरित केले आहेत. आता रशियन प्राणी उत्तर कोरियाच्या प्राणीसंग्रहालयात दिसणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत रशियन सरकारचे म्हणणे आहे की, हे प्राणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कोरियन लोकांना दिलेली भेट आहे.
सर्वात खास बाब म्हणजे प्राण्यांचं स्थलांतर रशियाचे नैसर्गिक संसाधन मंत्री अलेक्झांडर कोझलोव्ह यांच्या देखरेखेखाली करण्यात आले. या प्राण्यांना मॉस्को प्राणीसंग्रहालयातून पशुवैद्यांसह प्योंगयांग सेंट्रल प्राणीसंग्रहालयात विमानाने नेण्यात आले. त्याचवेळी, या संपूर्ण प्रकरणाबाबत, उत्तर कोरियाचे अधिकृत मीडिया केसीएनएने गुरुवारी सांगितले की, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याकडून दुर्मिळ प्राणी भेट म्हणून मिळाले आहेत.
रशियाने उत्तर कोरियाला भेटवस्तू म्हणून प्राणी पाठवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ही रशियाने गरुड, क्रेन आणि पोपट यांच्यासह अनेक पक्षी प्योंगयांग सेंट्रल प्राणीसंग्रहालयात पाठवले होते. जूनमध्ये पुतिन यांनी उत्तर कोरियाला भेट दिली, त्या दरम्यान उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यासोबत करार करण्यात आला. या करारामुळे प्योंगयांग आणि मॉस्को यांच्यातील संबंध अधिक घट्ट झाले आहेत. दोन्ही देशांमधील करारानुसार एकमेकांवर हल्ला झाल्यास ते तात्काळ लष्करी मदत करतील.
या करारामुळे रशिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांवर पाश्चात्य देशांकडून कडक निर्बंध आले आहेत. या वर्षी जून महिन्यात रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी उत्तर कोरियाला भेट दिली होती. या भेटीदरम्यान किम यांनी पुतिन यांना स्थानिक जातीच्या पंगसान कुत्र्यांची जोडी भेट दिली.