Russia-Ukraine War: भारत संपवणार दोन्ही देशांमधील युद्ध, स्वित्झर्लंडकडून शांतता चर्चेसाठी आमंत्रण
युक्रेन आणि रशिया या दोन देशांमधील युद्ध सुरु होऊन दोन वर्ष झाले आहे पण तरी देखील अजूनही दोन्ही देशांमध्ये कोणीही शांतता चर्चा घडवून आणलेली नाही. आता स्वित्झर्लंडने यासाठी पुढाकार घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील या चर्चेसाठी आमंत्रित केले आहे.
Russia-Ukraine war : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षापासून युद्ध सुरू आहे. या युद्धाने दोन्ही बाजूंच्या हजारो लोकांचे प्राण घेतले आहे तर लाखो लोकं बेघर झाली आहेत. युद्ध कधी संपणार याची जगभर लोकं वाट पाहत आहे. कारण युद्ध हे कोणालाच नकोय. आता युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. या संदर्भात स्वित्झर्लंडमध्ये शांतता चर्चा आयोजित केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी कालच संवाद साधला आहे.
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी पुतिन यांचे पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले की, भारत आणि रशियामध्ये एकत्र काम करण्यासाठी एक करार झाला आहे. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये रशिया-युक्रेन संघर्षावरही चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी संवाद आणि मुत्सद्देगिरीने पुढे जाण्याचा सल्ला दिला आहे. सवाद आणि मुत्सद्देगिरीच्या बाजूने भारताच्या पारंपारिक आणि सातत्यपूर्ण भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
बुधवारीच पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती दिली की भारत आणि युक्रेनमधील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी आणि मजबूत करण्यावर तपशीलवार चर्चा झाली. ‘युद्धविराम’ आणि रशियासोबत दोन वर्षांहून अधिक काळ चाललेले युद्ध संपवण्याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी लिहिले की, ‘शांततेसाठी आणि सुरू असलेला संघर्ष लवकरात लवकर संपवण्यासाठी भारत सर्व प्रयत्नांना पाठिंबा देत राहील.’
स्वित्झर्लंड चर्चेत का?
पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या चर्चेची माहिती देताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी प्रस्तावित स्वित्झर्लंड चर्चेचा उल्लेख केला. झेलेन्स्की यांनी लिहिले, ‘युक्रेनचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता, मानवतावादी सहाय्य आणि शांतता फॉर्म्युला बैठकींमध्ये सक्रिय सहभागासाठी भारताच्या समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो.’
युक्रेनचे अध्यक्ष म्हणाले की, सध्या स्वित्झर्लंडमध्ये तयार होत असलेल्या औपचारिक शांतता परिषदेत भारताचा सहभाग पाहणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. खरं तर, जानेवारी 2024 मध्ये, स्विस अध्यक्ष व्हायोला एमहार्ड यांनी घोषित केले होते की त्यांचा देश रशिया-युक्रेन युद्धासाठी शांतता सूत्रावर जागतिक शिखर परिषद आयोजित करेल. यापूर्वी 2022 मध्ये इंडोनेशियामध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेत झेलेन्स्की यांनी 10 कलमी शांतता प्रस्ताव मांडला होता. सादर केलेल्या योजनेचा अंतिम टप्पा म्हणजे शांतता करारावर स्वाक्षरी करणे. या प्रस्तावात आण्विक सुरक्षा आणि अन्न आणि ऊर्जा सुरक्षा यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे.
झेलेन्स्की म्हणतात की, कोणतीही शांतता चर्चा त्यांनी आधी सुचवलेल्या 10-बिंदू योजनेशी सुसंगत असावी. या योजनेत अन्न सुरक्षा, युक्रेनची प्रादेशिक अखंडता पुनर्संचयित करणे, रशियन सैन्याची माघार, सर्व कैद्यांची सुटका, हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांसाठी न्यायाधिकरण आणि त्यांच्या देशाच्या सुरक्षेची हमी यांचा समावेश आहे.
भारताची भूमिका महत्त्वाची का?
हा संवाद स्वित्झर्लंडद्वारे आयोजित केला जाणार आहे ज्याला ते सर्वसमावेशक बनवायचे आहे. हे लक्षात घेऊन स्विस परराष्ट्र मंत्रालयाने ग्लोबल साउथच्या नेत्यांशीही संपर्क साधला आहे. फेब्रुवारीमध्ये परराष्ट्र मंत्री इग्नाझियो कॅसिस यांच्या भारत आणि चीन दौऱ्यादरम्यान रशिया-युक्रेन संघर्ष हा सर्वात मोठा विषय होता. या संदर्भात आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी भारताला चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. झेलेन्स्की म्हणतात की युक्रेन जगातील सर्व देशांसाठी खुले आहे जे त्याच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करतात.
युद्ध सुरू झाल्यामुळे जग दोन गटात विभागले गेले. युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी नाटोचे सदस्य देश उभे राहिले, तेव्हा अमेरिका, ब्रिटन, पोलंड, फ्रान्ससह अनेक देशांनी युद्धापासून दूर राहून मदत करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे चीन, दक्षिण कोरिया, इराण हे देश प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे रशियाच्या पाठीशी उभे राहिले.