America vs Russia | रशियाच्या ‘या’ अस्त्राला अमेरिका घाबरली का? अखेर पुतिन यांना करावा लागला खुलासा
America vs Russia | व्हाइट हाऊसने अलीकडेच मोठा दावा केला होता. त्यावर आता रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी खुलासा केला आहे. रशियाने खरच असं शस्त्र विकसित केलं असेल, तर जगाचा प्रवास एका धोक्याच्या दिशेने सुरु आहे असच म्हणाव लागेल.
America vs Russia | रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचा मोठा आरोप फेटाळून लावलाय. अवकाशात अण्वस्त्र नेण्याची रशियाची कोणतीही योजना नसल्याच पुतिन यांनी म्हटलं आहे. उपग्रहांना टार्गेट करण्यासाठी रशिया अणवस्त्र विकसित करतोय, असा दावा अमेरिकेच्या व्हाइट हाऊसने केला होता. व्हाइट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी यांनी रशियावर 1967 च्या आउटर स्पेस ट्रीटी कराराच्या उल्लंघनाचा सुद्धा आरोप केला होता. अवकाशात अणवस्त्र तैनात करण्याची रशियाची कोणतीही योजना नाहीय, असं रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्पष्ट केलय. एपी वृत्तसंस्थेने ही बातमी दिलीय. रशियाने फक्त अमेरिकेच्या तोडीची अवकाश क्षमता प्राप्त केलीय.
रशियाने अवकाशात उपग्रह निकामी करण्याची आणि नष्ट करण्याची क्षमता विकसित केलीय. रशियाच्या या अस्त्रामुळे त्रास वाढणार आहे. या संदर्भातील काही मीडिया रिपोर्ट्सना व्हाइट हाऊसने दुजोरा दिला होता. त्यानंतर व्लादिमीर पुतीन यांनी हे स्पष्टीकरण दिलय. “आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे, आम्ही नेहमीच अवकाशात अणवस्त्रांच्या तैनातीचा विरोध केलाय आणि करत राहू. आम्ही सर्व देशांना अवकाशासंदर्भात झालेल्या करारांच पालन करण्याच आवाहन करतो. अमेरिका आणि अन्य देशांकडे असलेली अवकाश क्षमता रशियाने प्राप्त केलीय” असं रशियन संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले.
युक्रेनसाठी अमेरिकेने हा आरोप केला का?
“उपग्रह निकामी करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी आम्ही अवकाशात अणवस्त्र तैनात केलेलं नाही. उपग्रहाच्या कामात बाधा आणणार काम आम्ही करणार नाही” असं रशियन संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु म्हणाले. “व्हाइट हाऊस रशियावर असे आरोप करुन अमेरिकी काँग्रेसला युक्रेनच्या मदतीसाठी भाग पाडत आहे” असा आरोप सर्गेई शोइगु यांनी केला.