अमेझॉन विमान अपघातातील बेपत्ता मुलांचा शोध सुरूच, मुले सापडल्याचे वृत्त मागे घेतले, कोलंबियीन राष्ट्रपतींचा खुलासा
कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी बुधवारी ही चार मुले सुखरूप असल्याचे ट्वीट केल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात होता. त्यानंतर राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी आपले ट्वीट काल अचानक डिलीट करीत मुलांचा शोध सुरूच असल्याचे म्हटले आहे.
कोलंबिया : कोलंबियाच्या घनदाट अमेझॉन जंगलात 1 मे रोजी झालेल्या एका छोटया विमानाच्या अपघातानंतर त्यातील चार मुले वाचल्याचे वृत्त आले होते. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात असताना कोलंबियाच्या राष्ट्रपतींनी आपले आधीचे ट्वीट रद्द करीत अजूनही संबंधित मुलांचा शोध बचाव पथकामार्फत सुरूच असल्याचे सांगितल्याने सर्व मुले सुखरुप असावीत अशी प्रार्थना केली जात आहे. या मुलांच्या आईसह तीन जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. हे विमान अमेझॉनच्या अराराकुवारा येथून सॅन जोसे डेल ग्वावैअरे येथे जात असताना हा अपघात झाला होता.
अमेझॉन रेन फोरेस्टमध्ये 1 मे च्या पहाटे एक छोटे विमान कोसळून त्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. मात्र यातील चार लहान मुलांचा थांगपत्ता काही लागला नव्हता. या चार मुलांमध्ये एक 11 महिन्यांचे बाळ आणि अनुक्रमे 4, 9 आणि 13 या वयोगटातील मुलांचा समावेश आहे. त्यांचा काहीच सुगावा लागला नसतानाच कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी बुधवारी ही चार मुले सुखरूप असल्याचे ट्वीट केल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात होता. त्यानंतर राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी आपले ट्वीट काल अचानक डिलीट करीत मुलांचा सर्च ऑपरेशन सुरूच असल्याचे स्पष्ट केल्याने पुन्हा घोर वाढला आहे.
मुले जंगलात भटकत असावीत
या विमान अपघाताच्या जागी अर्धवट खाल्लेली फळे, बाळाची दूधाची बाटली, हेअरबॅंड आणि कात्री सापडल्याने ही मुले जीवंत असून जंगलात भटकत असावीत असा कयास बाळगला जात आहे. या मुलांनी जंगलाच्या दिशेने जाऊ नये यासाठी त्यांच्या आजीच्या आवाजातील ध्वनी फित जंगलात शोध मोहीमेतील सैनिकांमार्फत वाजविली जात आहे. या मुलांचे प्राण सुरक्षित रहाण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. 1 मे रोजी जंगलात कोसळलेल्या या छोटेखाणी विमानातून प्रवास करणाऱ्या मुलांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांनी पोलीसी स्निफर डॉगसह 100 हून अधिक सैनिक तैनात केले आहेत. तसेच हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. हे विमान अमेझॉनच्या अराराकुवारा येथून सॅन जोसे डेल ग्वावैअरे येथे जात असताना हा अपघात झाला होता.
सॅटेलाईट कम्युनिकेशन तुटले
ही मुले सुरक्षित आहेत, परंतू त्यांच्याशी असलेले सॅटेलाईट कम्युनिकेशन तुटले आहे. मुलांनी स्पीडबोटचा वापर केल्याचा संशय असून ती कदाचित काचिपोरोच्या रुरल एरीयात गेली असावीत अशी शक्यता आहे. त्यांचा शोध सुरू असून लवकरच ती सुरक्षित सापडतील असे सैनिकांनी म्हटले आहे.