शेख हसीना यांच्या राजीनाम्याने भारताला बसला धक्का, चीन-पाकिस्तान खूश
बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला आहे. लष्करप्रमुख वकार-उझ-जमान यांनी हसीना यांना ४५ मिनिटांत राजीनामा देण्याचे अल्टिमेटम दिले होते. त्यानंतर शेख हसीना यांनी देश सोडला आणि भारतात आश्रय घेतला आहे, पण यामुळे भारताला मोठा झटका बसणार आहे.
Shaikh Hasina : आरक्षणविरोधी आंदोलनामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा लागला आहे. इतकंच नाही तर त्यांना देश देखील सोडावा लागला. आता त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. शेख हसीना यांचे भारताशी बालपणीचे संबंध आहेत. त्यांचे शिक्षणही भारतातच झाले आहे. पण आता बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताला एक चांगला मित्र गमवावा लागू शकतो. बांगलादेशमध्ये शेख हसीना सत्तेत असल्यापासून त्यांचे भारतासोबत चांगले संबंध राहिले आहेत. पण सत्तेतून खाली आल्यानंतर भारताच्या ही चिंता वाढल्या आहेत. चीन आणि पाकिस्तानसाठी ही आनंदाची बाब मानली जात आहे. हे दोन्ही देश शेख हसीना यांच्या धोरणांच्या विरोधात आहेत.
चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी
शेख हसीना या 2009 मध्ये बांगलादेशच्या पंतप्रधानपदी निवडून आल्या. त्यानंतर चौथ्यांदा त्या पंतप्रधान झाल्या. मात्र देशातील हिंसक आंदोलनामुळे त्यांना पद सोडावे लागले. बांगलादेशच्या राष्ट्रीय आरक्षण धोरणाविरोधात हे आंदोलन आहे. या धोरणांतर्गत १९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या मुक्ती वाहिनी सदस्यांच्या वंशजांना आरक्षण देण्यात आले. याच युद्धाने बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले आहे. पण याला विद्यार्थ्यांचा विरोध होता. या आरक्षणाचा अवामी लीग समर्थकांना अन्यायकारक फायदा होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.
चुकीच्या पद्धतीने हाताळले आंदोलन
शेख हसीना यांच्या सरकारने विद्यार्थ्यांच्या या आंदोलनांना चुकीच्या पद्धतीने हाताळले त्यामुळे आक्रोश वाढत गेला. अवामी लीग पक्षाने आणि सुरक्षा दलांच्या लोकांनी कठोर कारवाई केली. त्यामुळे अनेक आंदोलक मारले गेले. शेख हसीना यांनी इंटरनेट सेवाही बंद केली. त्यामुळे हसीना सरकारविरोधात रोष चांगलाच वाढला. बेरोजगारी आणि देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याने सरकारविरोधात लोकं बोलत होते. हसीना यांना हुकूमशहा मानले जात होते. 2024 च्या निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप देखील आहे.
शेख हसीना यांच्या विरोधातील संतापाची लाट होती. विरोध वाढत गेला तसा सरकारने कठोर पाऊले उचलली. रविवारी झालेल्या आंदोलनात 100 हून अधिक लोक मारले गेले. त्यामुळे आंदोलन चिघळलं. वाढता विरोध पाहता शेख हसीना यांनी अखेर लष्करप्रमुखांकडे राजीनामा सोपवला. लोकांनी त्यांच्या घरात देखील घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना देश सोडावा लागला.
भारताला मोठा झटका
हसीना या भारताच्या भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या भागीदार आहेत. अर्थव्यवस्थेपासून ते दहशतवादविरोधी मुद्द्यांपर्यंत, शेख हसीना यांनी नेहमीच भारतासोबत काम करत आहेत. भारताचाही त्यांच्यावर विश्वास आहे. हसीना यांचा अवामी लीग मोठ्या प्रमाणात भारत समर्थक मानला जातो. शेख हसीनाच्या सांगण्यावरून भारताने बांगलादेशात मोठी गुंतवणूक केली आहे. दोन्ही देश त्यांच्या अर्थव्यवस्थांना जोडण्यासाठी रेल्वे, रस्ते, ऊर्जा या प्रकल्पांवर काम करत आहेत. भारत आणि बांगलादेशने भूभाग आणि पाणी वाटपावरून वादग्रस्त प्रश्नही सोडवले आहेत.
2024 मध्ये हसीना या अडचणीत आल्या असल्याने आता भारताने त्यांना आश्रय दिला आहे. चीन, पाकिस्तान आणि अमेरिकेने हसीना यांच्यावर भारताच्या विरोधात जाण्यासाठी खूप दबाव आणला, पण त्यांची ही चाल यशस्वी झाली नाही.