India-Canada Tension | खलिस्तान समर्थकाच्या घरावर अंदाधुंद गोळीबार, भारत-कॅनडा पुन्हा भिडणार?
India-Canada Tension | कॅनडाने मागच्या काही महिन्यात भारतावर गंभीर आरोप केले आहेत. स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या हरदीप सिंग निज्जरची मागच्यावर्षी कॅनडामध्ये हत्या झाली होती. या हत्येमागे भारतीय एजंट्स असल्याचा कॅनडाचा आरोप होता. आता पुन्हा भारत-कॅनडा संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.
India-Canada Tension | भारत-कॅनडामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कॅनडा आपल्या देशात खलिस्तान चळवळीला प्रोत्साहन देतो हे वादाच कारण आहेच. पण हरदीप सिंग निज्जरच्या हत्येवरुन भारत-कॅनडाचे संबंध बिघडले. आता हरदीप सिंग निज्जरच्या साथीदाराच्या घरावर गोळीबार झालाय. मागच्यावर्षी 18 जून रोजी सरे ब्रिटीश कोलंबिया येथे हरदीप सिंग निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आता गोळीबाराच्या ताज्या घटनेमुळे भारत-कॅनडामध्ये संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. कॅनडाच्या मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, सिमरनजीत सिंगच्या घरावर गोळीबार झालाय. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. घराच्या दरवाजावर तसेच दारात उभ्या असलेल्या गाडीवर गोळ्या झाडल्याची निशाण दिसत आहेत.
दक्षिण सरेमधील घरावर गोळीबाराची ही घटना घडलीय, असं रॉयल कॅनडीयन माऊंटेड पोलिसांनी सांगितलं. या गोळीबारात कोणीही जखमी झालेल नाहीय. या गोळीबारमागे काय उद्देश आहे? त्याचा शोध कॅनडा पोलिसांकडून घेतला जातोय. स्वतंत्र खलिस्तानच समर्थन करणाऱ्या गटाने भारतावर आरोप केलाय. 26 जानेवारीला वॅनकोव्युरमध्ये भारतीय दूतावासाबाहेर निदर्शने करण्याता आली. यामागे सिमरनजीत सिंग होता. त्या रागातून हा गोळीबार झाल्याचा आरोप आहे.
कॅनडामध्ये घुसून हत्या केली
मागच्या काही महिन्यांपासून भारत-कॅनडाच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत. भारताने कॅनडा सोबतच्या व्यापाराबद्दल अनेक निर्णय घेतले आहेत. दोन्ही देशातील हा तणाव आता कुठे कमी होत असताना पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. भारतीय एजंट्सनी कॅनडामध्ये घुसून हत्या केली असा आरोप जस्टिन ट्रुडो सरकारने केला आहे. स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारे दहशतवादी भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. कॅनडाच नाही, पाकिस्तानातही भारताविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना वेचून-वेचून मारल जातय. सिमरनजीत सिंगच्या घरावर झालेल्या या गोळीबाराची आता सखोल चौकशी होईल.