Somalia Attack : सोमालियात मुंबईसारखा हल्ला, दहशतवाद्यांकडून हॉटेलमध्ये फायरिंग; 12 ठार
Somalia Attack : या आधी हयात हॉटेलवर 9 तासांपूर्वी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी हॉटेलच्या आत घुसून हल्ला केला. त्यानंतर दोन कारमध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणण्यात आले.
मोगादिशू: सोमालियात (somalia) मुंबईवरील हल्ल्यासारखा हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी राजधानी मोगादिशू येथील हॉटेल हयातमध्ये (hotel hyatt) घुसखोरी करून ताबा मिळवला आहे. या हॉटेलमध्ये अतिरेक्यांनी अंधाधूंद गोळीबार केला आहे. त्यात 12 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेक परदेशी पर्यटक असल्याचंही सांगितलं जात आहे. या सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर हॉटेल हयातला सोमालियाच्या पोलीस (police) आणि लष्करांनी वेढा घातला आहे. राष्ट्रपती हसन शेख मोहम्मद यांनी मे महिन्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्याने सोमालिया हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या आधी हयात हॉटेलवर 9 तासांपूर्वी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी हॉटेलच्या आत घुसून हल्ला केला. त्यानंतर दोन कारमध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणण्यात आले. त्यानंतर पुन्हा अंधाधूंद गोळीबार करण्यात आला. अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित अल शबाब संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
कार बॉम्बस्फोट
अल शबाबने आज मोगादिशू येथील एका हॉटेलवर कब्जा केला. त्यानंतर अंधाधूंद गोळीबार केला. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, दोन कारमधून बॉम्बस्फोट घडवून हॉटेल हयातला निशाना करण्यात आलं. एक बॉम्ब हॉटेलच्या जवळील बॅरिअरला धडकला. दुसरा हॉटेलच्या गेटला धडकला. अतिरेकी अजूनही हॉटेलमध्ये दबा धरून बसले असावेत असं आम्हाला वाटतं. तर, दोन अधिकाऱ्यांनी हा दहशतवादी हल्लाच असल्याचं सांगितलं.
अतिरेकी अजूनही हॉटेलात
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. दहशतवादी अजून इमारतीत लपलेले आहेत. किती नुकसान झालंय याची डिटेल्स आमच्याकडे नाही. पण मोठं नुकसान झालं आहे. सुरक्षा दल दहशतवाद्यांशी लढत आहेत. अतिरेक्यांना इमारतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं सुरक्षा अधिकारी अब्दुलकादिर हसन यांनी म्हटल्याचं अल जजीराच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
सोमालियाला इशारा
हॉटेल हयात मोगादिशूचं एक महत्त्वाचं हॉटेल आहे. या ठिकाणी इतरही हॉटेल आहेत. मात्र, हॉटेल हयात पर्यटकांची पहिली पसंत आहे. या ठिकाणी सरकारी अधिकारी आणि सामान्य नागरिकही वारंवार येत असतात. त्यामुळे अतिरेक्यांनी या हॉटेललाच लक्ष्य करून सोमालियाला इशाराच दिल्याचं सांगितलं जात आहे.