Sunita Williams : धीर, संयम आणि घालमेल… सुनीता विल्यम्सच्या पहिल्याच प्रतिक्रियेने सर्वच हेलावले, म्हणाली, आता पुढची…
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या या स्पेस मिशनचा कालावधी आता 8 दिवसांवरून 8 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे. अंतराळात 3 महिने घालवल्यानंतर या दोन्ही अंतराळवीरांना आणखी 5 महिने अंतराळात राहावे लागणार आहे.
अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर गेल्या 3 महिन्यांपेक्षा अधिक काळा स्पेसमध्ये अडकले आहेत. स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमधून ते अंतराळात गेले होते, ते मात्र आता या दोघांशिवाय पृथ्वीवर लँड झालं आहे. सुनीता आणि बुच हे दोघे मात्र अजूनही अंतराळातच असून पुढल्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत ते पृथ्वीवर परत येऊ शकतील. स्टारलायनरच्या यशस्वी लँडिंगनंतर आता सुनीता विल्यम्स यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘ आम्ही पुढल्या संधीची वाट बघत आहोत’ असे सांगत सुनीता विल्यम्स यांनी संयम राखल्याचे नमूद केले. अंतराळयान परतल्यानंतर प्रथमच सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी वार्ताहर परिषदेत सहभाग घेऊन सर्वांसमोर आपली मते मांडली. दोन्ही अंतराळवीर म्हणाले, आमच्याशिवाय बोइंगचे स्टारलाइनर पृथ्वीवर परतताना पाहून आम्हाला खूप वाईट वाटले.
काय म्हणाले बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स ?
सुनीता यांच्यासोबत बुच विल्मोर हेही अंतराळातच अडकले आहेत. ‘ आम्हाला ते (स्टारलायनर) आमच्याशिवाय जाताना पाहायचं नव्हतं, पण तेच घडणार होतं. ते आमच्याशिवायच ( पृथ्वीवर) परत जाणार होतं’ असं विल्मोर म्हणालेत. ‘ तर आम्ही आता पुढल्या संधीकडे लक्ष देत आहोत, वाट पाहत आहोत’ असं सुनीता यांनी नमूद केलं.
मिशनमध्ये झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे ते बोइंग आणि नासा यांच्यावर नाराज आहेत का, असे दोन्ही अंतराळवीरांना विचारण्यात आले असता , बुच विल्मोर आणि सुनीता दोघांनीही या गोष्टीला नकार दिला. सुनीता विल्यम्स यांनी घातलेल्या टी-शर्टवर नासाचा लोगो होता, त्याकडे लक्ष वेधत बुच विल्मोर म्हणाले की – आम्ही ज्या गोष्टीसाठी, कारणासाठी उभे आहोत, हे त्याच गोष्टीचे, संस्थेचे प्रतिनिधित्व करते. आम्ही पुढे जात आहोत आणि असं काम करतोय, जे इतरांपेक्षा हटके आहे, असे त्यांनी नमूद केलं.
आम्ही तयार आहोत
सुनीता आणि बुच यांचं हे स्पेसमधलं मिशन आठ दिवसांचं होतं पण आता ते 8 महिन्यांचं झालंय. अंतराळात त्यांनी आत्तापर्यंत 3 महिने घालवले असून दोघांनाही आणखी 5 महिने तरी तेथेच रहावे लागणार आहे. ‘ आम्ही या साठी तयार आहोत. 8 दिवस असोत की आता 8 महीने , आम्ही आमचं सर्वोत्तम देऊ ‘असं विल्मोर म्हणाले.
अंतराळातून करणार मतदान
अमेरिकेत 5 नोव्हेंबरला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होत आहेत, त्याबाबत सुनीता आणि बुच विल्मोर म्हणाले की, आम्ही अवकाशातूनच मतदान करण्याचा विचार करत आहोत. आम्ही अंतराळातून मतदान करू हे किती वेगळे असेल ना!, असं सुनीता विल्यम्स हसत हसत म्हणाल्या.
दोघे परत कसे येणार ?
स्टारलाइनर स्पेसक्राफ्टमधील तांत्रिक बिघाडामुळे, सुनीता आणि बुच या दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्याचे मिशन वारंवार पुढे ढकलले जात होते, त्यानंतर नासाने 24 ऑगस्ट रोजी घोषित केले की सुनीता विल्यम्स आणि विल्मोर क्रू 9 मिशनचा भाग असतील आणि फेब्रुवारी 2025 मध्ये, स्पेसएक्स मिशनचा भाग असतील. के ड्रॅगन अंतराळयानाद्वारे 8 महिन्यांनंतर परत येतील. सध्या स्टारलायनर हे स्पेसक्राफ्ट दोन्ही अतंरावीरांविनाच पृथ्वीवर लँड झालंय.