सुनीता विल्यम्स अंतराळात सोबत कोणत्या देवाची मूर्ती घेऊन गेली? चुलत बहिणीकडून 9 महिन्यानंतर गुपित उघड
सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत येणार असल्याने भारतात आणि अमेरिकेत मोठा उत्साह आहे. त्यांचे कुटुंब आणि पूर्वजांचे गाव झूलासनमध्ये विशेष पूजा आणि हवन केले जात आहेत. सुनीताची चुलत बहिणी फाल्गुनी पंड्याने मुलाखत देताना सुनीता अंतराळात कोणत्या देवाची मूर्ती घेऊन गेली याची माहिती दिली आहे.

अखेर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार आहे. त्यामुळे अमेरिकेतच नव्हे तर भारतातही उत्साहाचं वातावरण आहे. भारतातील तिच्या पूर्वजांच्या गावात तर सर्वच जण देव पाण्यात घालून तिच्या येण्याची वाट पाहत आहेत. सुनीताच्या नातेवाईकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. सुनीताची चुलत बहीण फाल्गुनी पंड्याने खास मुलाखत दिली आहे. मीडियाला दिलेल्या या मुलाखतीत तिने पूजा अर्चा आणि हवन केल्याचीही माहिती दिली आहे. तिच्या वडिलोपार्जित गावात खुशीचं वातावरण पसरलं आहे. तिच्या मोठ्या भावानेही गावात पूजापाठ सुरू असल्याचं सांगितलं आहे.
सुनीता विलियम्सची चुलत बहिणी फाल्गुनी पंड्याने न्यू जर्सीतील एका मुलाखतीत बरीच माहिती दिली आहे. आम्ही सुनीताच्या परत येण्याबद्दल खूप उत्साहित आहोत. सुनीता सुखरूप यावी म्हणून आम्ही मंदिरात पूजा आणि हवन करणार आहोत.सुनीता तिच्या सोबत अंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात गणेशाची मूर्ती घेऊन गेली होती. तिने मला अंतराळ केंद्रावर गणेशाचं एक छायाचित्र पाठवलं होतं. 2007 मध्ये आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो होतो, तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर सुनीता आणि तिच्या वडिलांनी अमेरिकेत पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. सुनीताला भारतीय जेवण खूप आवडते. आम्ही पुन्हा भारतात येणार आहोत, असं फाल्गुनी पंड्याने सांगितलं.
कुंभमेळ्याचे फोटो पाठवले
सुनीता विलियम्स गुजरातची मुलगी आहे. तिच्या पूर्वजांचे गाव असलेल्या झूलासनमध्ये गावकरी सुनीताच्या पृथ्वीवर परत येण्याचा उत्सव साजरा करत आहेत. सुनीताचे वडील नेहमीच गुजरातपासून अमेरिकेपर्यंतचा त्यांचा प्रवास सांगत असतात. जेव्हा मी कुंभ मेळ्याच्या दौऱ्याला भारतात आले होते, तेव्हा सुनीता कुंभमेळ्याबद्दल खूप उत्सुक होती. मी तिच्याकडे कुंभमेळ्याचे काही छायाचित्रे पाठवली, आणि तिने अंतराळातून कुंभमेळ्याचे एक छायाचित्र पाठवले. ती छायाचित्रं खूप सुंदर होती. सुनीता नेहमीच तरुण सशक्तीकरणात विश्वास ठेवते. मागील आठवड्यात मी तिला फोन केला होता, ती 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परत येणार आहे, यावर ती खूप उत्साहित होती. आम्ही काही दिवसांमध्ये तिला भेटण्याचा विचार करत आहोत. पृथ्वीवर परतल्यानंतर ती पुनर्वास केंद्रात जाईल, जिथे आम्ही तिच्याशी भेटू, असं फाल्गुनी म्हणाली.
गुजरातमध्ये उत्साह
सुनीता विलियम्स 9 महिने अंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावरून शेवटी पृथ्वीवर परत येत आहेत. तिच्या परत येण्याच्या बातमीने कुटुंबाचा आनंद गगनाला भिडला आहे. ती सुखरुप परत यावी म्हणून गावात यज्ञ आणि पूजा आयोजित केली जात आहे. सुनीता विलियम्सच्या मोठ्या भावाने दिनेशने याबद्दल माहिती दिली. सुनीता 9 महिने अंतराळात होती. घरातील सगळ्यांना तिची चिंता लागली होती. कुटुंबातील सगळे दु:खी होते. वर्तमानपत्रात सुनीताच्या संदर्भात काही बातम्या येत होत्या, तेव्हा आम्ही चिंतित होतो. पण आता (19 मार्च) सुनीताची सुरक्षित परत येण्याची बातमी मिळाल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे, असं दिनेश म्हणाला.
जोपर्यंत सुनीता विलियम्स सुरक्षितपणे पृथ्वीवर येत नाही, तोपर्यंत मला थोडी चिंता आहे. घरातील अनेक लोक मला विचारतात आणि मी त्यांना सर्व काही व्यवस्थित माहिती देतो. पण जेव्हा सुनीता पृथ्वीवर सुरक्षितपणे येईल, तेव्हाच माझे मन शांत होईल. सुनीतासाठी, झूलासन गावासाठी, गुजरात आणि संपूर्ण जगासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे, असंही दिनेशने सांगितलं.
गावात आनंद
सुनीता विलियम्सच्या अंतराळातून परत येण्याच्या बातमीनंतर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील झूलासन गावातही आनंदाचे वातावरण आहे. सगळे लोक देवाकडे प्रार्थना करत आहेत, ती सुरक्षितपणे पृथ्वीवर परत येवो, असं साकडं देवाला घातलं जात आहे. झूलासन गावात तिच्या स्वागताची तयारी चालली आहे. सुनीता नक्कीच गावात येईल, अशी या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. सुनीता तीन वेळा गावाला येऊन गेली आहे. पहिली वेळ 2006 मध्ये आणि दुसरी वेळ 2012 मध्ये. पण ती परत आल्यावर आम्ही तिचं भव्य स्वागत करू, असंही ग्रामस्थ म्हणाले.