पत्नीच्या वर्क फ्रॉम होमचा गैरफायदा, कमावले लाखो रुपये पण…
कोरोनानंतर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली होती. कोरोना गेला असला तर अनेक कंपन्या अजूनही खर्च वाचवण्यासाठी वर्क फ्रॉम होमची सुविधा देत आहेत. पण यामुळे कधी कधी फसवणूक देखील होऊ शकते. असंच एक प्रकरण सध्या समोर आले आहे.
Work from Home : कोरोनानंतर अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम कल्चरचा अवलंब केला आहे. कोरोनामुळे जेथे लोकांना बाहेर पडण्यास मनाई होती. त्यामुळे अनेकांना घरुनच काम करण्याची परवानगी देण्यात आली होती. अजूनही अनेक कंपन्या वर्क फ्रॉम होमचा अवलंब करत आहेत. पण अमेरिकेतील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या वर्क फ्रॉम होमचा गैरफायदा घेतला. त्याने सुमारे २० लाख डॉलर्स कमावले. पण यामुळे त्याला पत्नीकडून ही झटका लागला.
व्यक्तीवर कायदेशीर कारवाई
पत्नीचा विश्वास गमावल्याने पतीला तिने घटस्फोटाची नोटीस पाठवली. या शिवाय संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाईही केली जात आहे. हे प्रकरण आहे टेक्सासचे. येथे ट्रेडिंग एजंट म्हणून काम करणारी एक महिला वर्क फ्रॉम होम करत होती. पण महिलेचा पती दुसऱ्या खोलीतून त्यांचे संभाषण ऐकत असे. या संभाषणातून मिळालेल्या सूचनांच्या आधारे तो चुकीच्या पद्धतीने व्यापार करत असे. पतीच्या या पराक्रमाची पत्नीला कल्पना नव्हती. पण नंतर पतीने पत्नीला सर्व चुकीच्या व्यवहाराची कबुली दिली. पत्नीला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा ती पतीवर प्रचंड संतापली. ती त्याला सोडून निघून गेली आणि पतीविरुद्ध घटस्फोटाचा दावाही दाखल केला.
चुकीच्या व्यवहारांची कंपनीला माहिती
महिलेने आपल्या पतीने केलेल्या चुकीच्या व्यवहारांची माहिती तिच्या कंपनीलाही दिली. पण बेकायदेशीर व्यापार केल्याचा कोणताही पुरावा नसतानाही कंपनीने महिलेला नोकरीवरून काढून टाकले. नंतर तोडगा म्हणून पतीने व्यापारातून कमावलेले पैसे परत देण्याचे मान्य केले. याशिवाय तो दंड भरण्यासही तयार होता.
जगात अनेक अशा घटना घडत असतात ज्यामध्ये फसवणुकीचे प्रकार समोर येत असतात. फसवणूक झाल्यानंतर अनेकांना मोठे नुकसान सहन करावे लागते. पण बऱ्याच प्रकणांमध्ये त्याची भरपाई देखील मिळत नाही. वर्क फ्रॉम होमचा असा देखील कोणी गैरफायदा घेऊ शकतो याची कोणाला देखील कल्पना आली नसेल. पण त्या पतीने आपल्या पत्नीचा विश्वास कायमचा गमावला. पैशांमुळे नाती तुटली याचा पश्चताप नक्कीच त्याला होत असेल.