पत्नीला मॅसेज केला, ‘मी एव्हरेस्टवर पोहचलो’, नंतर गायब झाला गिर्यारोहक
39 वर्षीय श्रीनिवास हे सिंगपापूर येथील एका रिअल इस्टेट फर्मचे एक्झुकेटीव्ह डायरेक्टर आहेत. ते त्यांच्या टीमसह माऊंट एव्हरेस्टकरीता 1 एप्रिलला रवाना झाले होते. ते 4 जूनला घरी परतणार होते.
नवी दिल्ली : जगातील सर्वात उंच पर्वत असलेल्या एव्हरेस्ट शिखराला सर करण्यास गेलेले मूळ भारतीय वंशाचे सिंगापूरचे नागरिक श्रीनिवास सैनी दत्तात्रय हे गेल्या दोन आठवड्यापासून बेपत्ता झाले आहेत. गेल्या एप्रिल महिन्यात ते माऊंट एव्हरेस्टची चढाई करण्यासाठी नेपाळला गेले होते. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या शोधासाठी मोहिम सुरू केली आहे. स्थानिक नागरिक, रेस्क्यू टीम आणि काही गिर्यारोहकांच्या टीमची त्यासाठी मदत घेतली जात आहे.
श्रीनिवास आपल्या ग्रुपपासून वेगळे होऊन बेपत्ता झाले असावेत असा कयास केला जात आहे. 8000 मीटरची चढाई केल्यानंतर ते पर्वताच्या तिबेटच्या दिशेला पडले असावेत असे म्हटले जात आहे. श्रीनिवास यांच्या सोबत एक गाईड देखील होते. ते सुरक्षित बेस कॅम्पला पोहचले आहेत. त्यामुळे श्रीनिवास यांचा शोध घेणे सोपे होईल असे म्हटले जात आहे. शुक्रवारपासून शेर्पांची टीम त्यांचा शोध घेत असून अजूनही त्यांचा काही पत्ता लागलेला नाही.
ऑनलाईन अभियान
श्रीनिवास यांनी 8500 मीटर उंचीवरील चढाईनंतर बेस कॅंपशी शेवटचा संपर्क केला होता. त्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत. श्रीनिवास यांच्या शोधासाठी त्यांची चुलत बहीण दिव्या भरत हीने ऑनलाईन अभियान देखील सुरू केले आहे. दिव्या भरत हिने म्हटले आहे की श्रीनिवासला हिमबाधा आणि श्वसनास त्रास झाला होता. त्यामुळे ते त्यांच्या गटापासून वेगळे झाले असावेत, त्यामुळे ते पर्वताच्या तिबेटच्या बाजूला कोसळले असावेत.
पत्नीला शुक्रवारी पाठवला होता संदेश
39 वर्षीय श्रीनिवास हे सिंगपापूर येथील एका रिअल इस्टेट फर्मचे एक्झुकेटीव्ह डायरेक्टर आहेत. ते त्यांच्या टीमसह माऊंट एव्हरेस्टकरीता 1 एप्रिलला रवाना झाले होते. ते 4 जूनला घरी परतणार होते. त्यांनी त्यांच्या पत्नी सुश्मा सोमा यांना शेवटचा टेक्स्ट मॅसेज शुक्रवारी पाठविला होता, त्यात त्यांनी आपण एव्हरेस्टवर पोहचलो असून खाली उतरण्यास असमर्थ असल्याचे कळविले होते. शनिवारी पहाटे 2 वाजता सुश्मा यांना कळले की तिचे पती दोन शेर्पा सोबत होते आणि गटातील एका व्यक्तीला पर्वतावरून खाली आणण्यात यश आले. परंतु श्रीनिवासला खाली आणता आले नाही.