जग बघेल इराणचा बदला, इस्रायलवर हल्ल्यासाठी योजना तयार
इस्रायलने शनिवारी इराणवर मोठा हल्ला केला होता. ज्यामध्ये त्यांच्या लष्करी तळांना लक्ष्य केले गेले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणने इस्रायलवर निर्णायक आणि वेदनादायक हल्ल्याची योजना आखली आहे. अमेरिकेत ५ नोव्हेंबरला होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी हा हल्ला होण्याची शक्यता आहे.
शनिवारी इस्रायलने इराणच्या अनेक लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले होते. त्यानंतर आता इराणही इस्रायलला प्रत्युत्तर देणार आहे. इराणकडून प्रत्युत्तराच्या हल्ल्याची तयारी सुरू असून हा हल्ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी म्हणजेच ५ नोव्हेंबरआधी केला जाईल अशी माहिती आहे. सीएनएनच्या वृत्ताच्या हवाल्याने व्हायनेटन्यूजने हा दावा केला आहे. इराणच्या एका सूत्राने दावा केला आहे की, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी इस्रायलने केलेल्या हल्ल्याला इराण चोख प्रत्युत्तर देईल.
अमेरिकेत या मंगळवारी म्हणजेच ५ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत इराण पुढील चार दिवसांत इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता आहे. इराणकडून हल्ल्याचा दावा करणाऱ्या वृत्तांवर इस्रायलने प्रतिक्रिया दिली आहे. इराणकडून जर कोणताही हल्ला झाला तर त्याला दुप्पट प्रत्युत्तर मिळेल, असे इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
इस्रायलला अमेरिकेकडून मदतीचे आश्वासन
अमेरिकेने पुन्हा एकदा इराणला इस्रायलवर हल्ला न करण्याचे आवाहन केले आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या करिन जीनपियरे यांनी या संदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, ‘इराणने इस्रायलवर कोणतीही कारवाई करू नये. त्यांनी तसे केल्यास आम्ही इस्रायलच्या संरक्षणाला पाठिंबा देऊ. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, इराणला कोणतेही उत्तर देण्याची गरज नाही. आम्ही सतत संघर्ष वाढवू नका असे आवाहन केले आहे.
शनिवारी रात्री इस्रायलने हल्ला केल्यानंतर वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, तेहरानला या हल्ल्यांना ‘योग्य वेळी’ प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड कमांडर होसेन सलामी यांच्यासह अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी या हल्ल्यांचा बदला घेणार असल्याचे म्हटले आहे.
इस्रायलवर प्रत्युत्तरादाखल हल्ल्याचा अंतिम निर्णय इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांना घ्यायचा आहे. असे मानले जाते की खमेनेई यांना इस्रायल आणि अमेरिकेबरोबर पूर्ण प्रमाणात युद्ध टाळायचे आहे. या हल्ल्यानंतरही खामेनी यांनी आपल्या वक्तव्यात इस्रायलच्या कारवाईला अतिशयोक्ती देऊ नये आणि या हल्ल्याला कमी लेखू नये, असे म्हटले होते.
इस्रायलकडूनही तयारी
दुसरीकडे इराण बदला घेईल हे इस्रायलला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे इस्रायलने देखील तयारी केली आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मंत्रिमंडळाने सुरक्षेबाबत आढावा घेतला. या बैठकीला फक्त मंत्री उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव बैठक ही बंकरमध्ये घेण्यात आली.