Israel-Iran Tension : कुठल्याही क्षणी इस्रायलवर होऊ शकतो मोठा हल्ला, अमेरिकेचा दावा
Israel-Iran Tension : जगात सध्या दोन युद्ध सुरु आहेत. रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास आता तिसऱ्या युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. इस्रायल हाय अलर्टवर आहे. कुठल्याही क्षणी इस्रायलवर मोठा हल्ला होईल, असा अमेरिकेने दावा केला आहे. 100 पेक्षा जास्त ड्रोन आणि मिसाइलने हा हल्ला होऊ शकतो.
सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये इस्रायलने इराणी दूतावासावर हवाई हल्ला केला होता. या घटनेनंतर इराणने इस्रायलला धडा शिकवणार असल्याच जाहीर केलं आहे. वीकेंडआधी इराण इस्रायलवर मोठा हल्ला करु शकतो, असा दावा आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपले इरादे जाहीर केले आहेत. आम्ही बचाव आणि हल्ला दोन्हींसाठी तयार आहोत. या दरम्यान दोन अमेरिकन अधिकारी आणि मोसादच्या एका माजी अधिकाऱ्याने मोठा दावा केला आहे. सीबीएस न्यूजशी बोलताना दोन अमेरिकी अधिकारी म्हणाले की, “इराण कुठल्याही क्षणी इस्रायलवर हल्ला करु शकतो. 100 पेक्षा जास्त ड्रोन आणि मिसाइलने हा हल्ला होऊ शकतो. इराणकडून सैन्य तळांना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे” हे युद्ध सुरु झाल्यास इस्रायलसाठी आव्हानात्मक स्थिती असेल.
इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादचे माजी अधिकारी सिमा शाइन म्हणाले की, “2019 प्रमाणे इराण इस्रायलवर मिसाइल आणि ड्रोन हल्ला करु शकतो. सैन्य तळ आणि डिफेंसशी संबंधित अन्य संस्थांच नुकसान करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्यामुळे बरच नुकसान होऊ शकतं. सौदी अरेबियावर मिसाइल हल्ला झाला होता. सौदीने यासाठी इराणवर आरोप केला होता” इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एअरबेसचा दौरा केला. “कोणी आमचं नुकसान केलं, तर आम्ही सोडणार नाही. बचाव आणि हल्ला दोन्हीसाठी आम्ही तयार आहोत” असं नेतन्याहू म्हणाले. तेच तेहरानने त्यांची योजना अजून उघड केलेली नाही. इस्रायलवर थेट हल्ला झाल्यास हमास विरुद्ध सुरु असलेलं युद्ध आणखी भडकू शकतं किंवा नव्या युद्धाला तोंड फुटेल.
इराण इस्रायलवर कसा हल्ला करेल?
इस्रायलला आम्ही धडा शिकवणार हे इराणने स्पष्ट केलय. पर्शियन गल्फ आणि लाल सागरात त्यांनी आपली दोन जहाज सुद्धा उतरवली आहेत. या जहाजांची क्षमता लक्षात घेऊन अमेरिका आणि इस्रायल दोघेही अलर्टवर आहेत. या जहाजांमध्ये क्रूज मिसाइल आणि यूएवी लॉन्च करण्याची क्षमता आहे. इस्रायलला मिळालेल्या माहितीनुसार, या जहाजांच्या माध्यमातून इराण समुद्रमार्गाने हल्ला करु शकतो. त्याशिवाय सैन्य तळावर ड्रोन हल्ला होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन इस्रायलने आपला कोस्टल एरिया हाय अलर्टवर ठेवला आहे. इराणने अमेरिकेसह मिडल ईस्टच्या देशांना इशारा दिला आहे. इराणच्या विरोधात जाणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली आहे.