UPI पेमेंटची आता सिंगापूरात घौडदौड, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सेवा सुरू, NRI तसेच विद्यार्थ्यांना होणार फायदा
भारतातील डिजीटल ट्रांझक्शन पर्याय बनलेल्या UPI पेमेंटला आता सिंगापूरनेही स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली एच लूंग यांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूरच्या संबंधात मंगळवारी नविन अध्याय जोडला गेला आहे. भारतातील डीजिटल व्यवहारासाठी सर्वात लोकप्रिय असलेल्या युपीआयला आता सिंगापूरने स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली.एच.लूंग यांच्यात भारताचे UPI आणि सिंगापूरच्या PAYNOW दरम्यान क्रॉस – बॉर्डर कनेक्टिविटी करार करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील नागरीकांना क्रॉस – बॉर्डर पेमेंट करणे सोपे होणार आहे.
याप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की UPI आणि PayNow यांना एकत्र जोडल्याने भारत-सिंगापूरच्या संबंधाना एक वेगळा आयाम मिळणार आहे. युपीआय पेमेंट आता दुसऱ्या देशातही आपले पाऊल ठेवत आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास आणि सिंगापूरच्या मौद्रिक प्राधिकरणाचे मॅनेजिंग डायरेक्टर रवि मेनन यांनी या क्रॉस -बॉर्डर सुविधेची सुरूवात केली.
प्रवासी भारतीयांना होणार फायदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की भारत आणि सिंगापूर दरम्यानच्या ‘क्रॉस बॉर्डर फिनटेक कनेक्टिविटी’ मुळे एका नव्या अध्यायाला सुरूवात झाली आहे. आजपासून सिंगापूर आणि भारताचे लोक आपल्या मोबाईल फोनद्वारे त्यांच्या देशात करतात तसेच डीजिटल पेमेंट एकमेकांशी करू शकणार आहेत.
या सुविधेचा सर्वात जास्त फायदा प्रवासी भारतीय, विद्यार्थी आणि व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे. या सुविधेमुळे सिंगापूरमध्ये काम करणारे भारतीय लोक आपल्या घरी सहजतेने पैसे पाठवू शकणार आहेत. तसेच तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घरून पैसे मागविणे सोपे होणार आहे.
रोखीचे व्यवहार कमी होतील
युपीआय भारताचे सर्वात आवडती पेमेंट सिस्टीम बनले आहे. साल २०२२ मध्ये युपीआयद्वारे 1,26,000 अब्ज रूपयांचे व्यवहार झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहारात होत असल्याने या देशी पेमेंटला सर्वात विश्वासार्ह मानल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहारात होत असल्याने या देशी पेमेंटला सर्वात विश्वासार्ह मानल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की येत्या दिवसात डिजिटल वॉलेटद्वारे होणारे व्यवहार रोखीच्या व्यवहारांना मागे टाकतील असेही मोदी यांनी सांगितले.
या देशांशी झाला करार
सिंगापूरच्या आधी युपीआयने देशाबाहेर अनेक देशांशी देखील करार केला आहे. भारताच्या नेशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची शाखा असलेल्या एनपीसीआय इंटरनेशनल पेमेंट्स लिमिटेडने (NIPL) भूतानच्या रॉयल मोनेटरी अथॉरीटी बरोबर करार केला आहे. भारताची युपीआय पेमेंट सर्व्हीसला मान्यता देणार नेपाळ हा पहिला देश ठरला आहे. नेपालच्या मनम इंफोटेक एंड गेटवे पेमेंट्स सर्विसने युपीआय पेमेंटची सुरूवात केली आहे. तसेच मलेशिया, ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीने देखील युपीआयला मान्यता दिली आहे.