Donald Trump-Vladimir Putin : डील मान्य करा, नाहीतर…पुतिन यांना सूचक शब्दात अमेरिकेकडून समज
Donald Trump-Vladimir Putin : मागच्या तीन वर्षांपासून रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. अमेरिकन अधिकारी चर्चेसाठी रशियाला जाणार आहेत. दरम्यान अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रशियाला इशारा सुद्धा दिला आहे.

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीने चर्चा सुरु आहे. या दरम्यान अमेरिकेने एक मोठ पाऊल उचललं आहे. अमेरिकन अधिकारी चर्चेसाठी रशियाला जाणार आहेत, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तिथे 30 दिवसांच्या सीजफायर संबंधी चर्चा होईल. युक्रेनने या प्रस्तावाला समर्थन दिलय. युद्ध समाप्तीच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल अशी अपेक्षा आहे. ट्रम्प यांनी यावेळी रशियाला कठोर शब्दात इशारा सुद्धा दिला आहे. वेळ पडल्यास आम्ही तुमच खूप वाईटही करु शकतो असं ट्रम्पनी म्हटलय.
व्हाइट हाऊसमध्ये आयरिश पंतप्रधान माइकल मार्टिन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांनी रशिया-युक्रेन युद्ध आणि संभाव्य युद्ध विरामासंबंधी ट्रम्प यांना प्रश्न केला. त्यावर ट्रम्प म्हणाले की, “अमेरिकन अधिकारी रशियाला जात आहेत. शांतता चर्चा पुढे नेण्यासाठी तिथे ते चर्चा करतील” “युद्धामुळे झालेला विनाश आणि निष्पाप लोकांचा मृत्यू लक्षात घेता युद्ध लवकरात लवकर संपवणं आवश्यक आहे” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
रशियाला बरच काही दिलं
युद्धविरामासाठी रशियावर दबाव टाकण्यासाठी अमेरिका काय करणार? असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला. रशियासंबंधी आधीच्या अमेरिकी राष्ट्रपतींच्या धोरणावर त्यांनी टीका केली. ‘जे मी रशियाविरोधात केलं, ती आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाई होती’ असं ट्रम्प म्हणाले. ओबामा आणि बुश यांनी रशियाला बरच काही दिलं असं ते म्हणाले.
त्यांच्यासाठी खूप वाईट असेल
रशियाला आर्थिक रुपाने उद्धवस्त करण्याचे अमेरिकेकडे अनेक मार्ग आहेत असं ट्रम्प म्हणाले. पण मी असं करणार नाही कारण शांतता प्रस्थापित करण हा माझा उद्देश आहे असं त्यांनी सांगितलं. “रशियाने चर्चेचा मार्ग स्वीकारला नाही, तर अमेरिका अशी पावल उचलेल, जी त्यांच्यासाठी खूप वाईट असतील” असा इशारा ट्रम्प यांनी दिला
जेलेंस्की काय म्हणाले?
यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेंस्की यांनी अमेरिका आणि रशियामध्ये जेद्दा येथे झालेल्या चर्चेला रचनात्मक ठरवलं. 30 दिवसांच्या सीजफायरकडे कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याची एक संधी म्हणून पहावं, असं जेलेंस्की म्हणाले. आम्हाला हे युद्ध संपवायचं आहे, असं जेलेंस्की म्हणाले. शांतता चर्चेसाठी रशियाने तयार व्हावं, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत असं जेलेंस्की म्हणाले.
रशिया तयार होईल का?
रशियाने अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारच्या युद्ध विरामाची तयारी दाखवलेली नाही. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आधीच स्पष्ट केलय की, आमच्या हितांची काळजी घेतली, तरच रशिया शांतता करार मान्य करेल. युद्धविरामासाठी अमेरिका-युक्रेनकडून प्रयत्न सुरु आहेत. आता प्रश्न हा आहे की, रशिया शांततेसाठी तयार होईल की, डोनाल्ड ट्रम्प यांना कठोर आर्थिक निर्बंधांसारखी पावलं उचलावी लागतील.