जेरूस्लेम | 7 ऑक्टोबर 2023 : पुन्हा एकदा जग युद्धाच्या खाईत लोटलं गेलं आहे. आता इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध (Israel-Palestine War) सुरू झालं आहे. इस्रायलने या युद्धाची अधिकृत घोषणा केली आहे. गाजा येथील हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर पाच हजाराहून अधिक रॉकेट डागले आहेत. त्यामुळे इस्रायलची दाणादाण उडाली आहे. पॅलेस्टाईनकडून झालेल्या या कृत्यामुळे चवताळलेल्या इस्रायलनेही युद्धाची घोषणा केली आहे. युद्धाची घोषणा होताच अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दिला आहे. हमासने खासकरून दक्षिण आणि मध्य इस्रायलवर निशाणा साधला आहे. त्यांनी दक्षिण परिसरातील सैन्य कॅम्पवर हल्ला चढवला आहे. एवढंच नव्हे तर हमासने इस्रायलच्या सैनिकांना ओलीस धरलं आहे. या हल्ल्यात इस्रायलचे 15 लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे.
शनिवारी पहाटे पॅलेस्टीनी दहशतवाद्यांनी इस्रायलच्या अनेक भागात रॉकेटचा मारा केला. त्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली आहे. तसेच आपल्या नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहेत. गाजापट्टीकडून इस्रायलच्या निवासी भागात रॉकेट डागण्यात आले आहेत. हवाई हल्ल्यामुळे इस्रायलने वाजवलेली सायरनची आवाज देशाची आर्थिक राजधानी तेल अवीवपर्यंत ऐकायला आली आहे, असं इस्रायलच्या एका जवानानाने म्हटलं आहे.
आज पहाटे हमासने इस्रायलवर बॉम्बचा वर्षाव केला. तब्बल अर्धा तास हा बॉम्ब वर्षाव सुरू होता. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एका इमारतीवर रॉकेट पडल्याने एक 70 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. तसेच एक 20 वर्षीय व्यक्तीही जखमी झाला आहे. मात्र, त्याला किरकोळ मार लागला आहे.
या हल्ल्यानंतर हमासचा नेता मोहम्मद डेफ याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हमासने इस्रायल विरोधात युद्ध छेडले आहे. ऑपरेशन अल अक्सा स्टॉर्म असं या ऑपरेशनचं नाव आहे. ही मोहीम सुरू करण्यासाठी आम्ही इस्रायलवर पाच हजार रॉकेट डागले आहेत, असं डेफ यांनी सांगितलं.
या युद्धावर अमेरिकेने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इस्रायलला आत्मरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तेल अवीवमध्ये आताच हल्ला करण्यात आला आहे. इस्रायली सैन्याच्या वाहनांवरही हमासच्या लोकांनी ताबा मिळवला आहे. हमासचे डझनभर लोक इस्रायल सैन्याच्या कँम्पमध्ये घुसले आहेत. अनेक इस्रायली सैनिकांना ओलीस ठेवण्यात आलं आहे, असं अमेरिकेने म्हटलं आहे.
तर भारताचे इस्रायलमधील राजदूत नाओर गिलोन यांनीही यावर ट्विट केलं आहे. यहुदींच्या सुट्ट्यांच्या काळात इस्रायलवर गाजाकडून संयुक्त हल्ला करण्यात येत आहे. रॉकेटने हल्ला केला जात आहे. हमासचे लोक घुसले आहेत. परिस्थिती कठिण आहे. मात्र, या युद्धात इस्रायलचाच विजय होईल, असं गिलोन यांनी म्हटलं आहे.