Pakistan Crisis | मैत्रीत दरार ! जवळचा मित्र पाकिस्तानवर उलटला, सीमेवर दोन्ही देश भिडले
Pakistan Crisis | पाकिस्तानच्या एका सीमेवर युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. एका मित्र देशाबरोबर पाकिस्तानी सैन्य भिडलं. परिस्थिती गंभीर आहे. तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य अधिकारी घटनास्थळावर पोहोचले आहेत.
इस्लामाबाद : अफगाणिस्तानात आता तालिबानची राजवट आहे. पाकिस्तानने नेहमीच तालिबानच्या दहशतवादी कृत्यांना पाठिशी घातलं. त्यांचं समर्थन केलं. दहशतवादी कारवायांसाठी नेहमीच तालिबानचा वापर करुन घेतला. दोन वर्षापूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यावेळी तालिबान आणि पाकिस्तान मिळून भारताची डोकेदुखी वाढवतील असं अनेकांना वाटत होतं. तालिबानच अफगाणिस्तानात सत्तेवर असणं, ही पाकिस्तानच्या दृष्टीने अनुकूल स्थिती मानली होती. पण आता वास्तव बदलल आहे. अफगाणिस्तानात तालिबान आणि पाकिस्तानमध्ये सख्य राहिलेलं नाही. बॉर्डरवर दोन्ही देश आपसात भिडत आहेत.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तामध्ये असलेली तोरखम बॉर्डर बंद करण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. तोफ गोळ्यांचा मारा करण्यात आला. युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सैन्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून स्थिती शांत करण्यासाठी पावल उचलण्यात आली आहेत. पाकिस्तानचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिस्थिती शांत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असं ‘द खुरासान डायरी’ने म्हटलं आहे. याआधी फेब्रुवारी 2023 मध्ये तोरखम बॉर्डर सील झाली होती. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध आता मोठ्या प्रमाणात बिघडले आहेत. अफगाणिस्तानात जेव्हापासून तालिबान सत्तेवर आहे, तेव्हापासून दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत.
पाकिस्तानकडून एअर स्ट्राईक
मागच्यावर्षी एप्रिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनारमध्ये एअर स्ट्राइक केला होता. त्यात 36 तालिबानी ठार झाले होते. पाकिस्तानने मात्र एअर स्ट्राइकचा आरोप फेटाळून लावला होता. अफगाणिस्तानचे दहशतवादी सीमा ओलांडून दहशतवादी हल्ले करतात, असा पाकिस्तानचा आरोप आहे. त्यावर, आम्ही सत्ता संभाळल्यापासून नियंत्रण आलय, असं तालिबानच म्हणणं आहे.
एअर स्ट्राइक झाल्यानंतर तालिबानने काबूल स्थित पाकिस्तानी राजदूताला तलब केलं व असे हल्ले थांबवण्यास सांगितलं. पाकिस्तानी राजदूताला तलब केल्यानंतर अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी स्टेटमेंट जारी केलं. पाकिस्तानी राजदूताला खोस्त आणि कुनारमध्ये सैन्य कारवाई तात्काळ थांबवण्यास सांगितली.