भारताने नाक दाबताच पाकिस्तानची भाषा बोलणारा तुर्की आला ठिकाण्यावर
कझान शिखर परिषदेत ब्रिक्स भागीदार देश म्हणून भारताने आपल्या प्रवेशाला विरोध केल्याचे वृत्त तुर्कीने फेटाळले आहे. भारताच्या विरोधामुळे तुर्कस्तान ब्रिक्सचा भाग होऊ शकला नाही, असा दावा जर्मन वृत्तपत्राने केला होता. ज्यावर आता तुर्कस्तानची प्रतिक्रिया आली आहे.
तुर्कस्तान भारताविरुद्ध बोलण्याची एकही संधी सोडत नाही. तुर्की नेहमीच काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या बाजुने उभा राहिला आहे. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन हे भारताविरोधात नेहमीच वक्तव्य करत असतात. पण त्यांचा सूर आता जरा कमी झालेला दिसतोय. गेल्या महिन्यात एर्दोगन यांनी संयुक्त राष्ट्रातील भाषणात काश्मीरचा उल्लेख टाळला होता. आता भारताच्या विरोधानंतर तुर्कस्तानचा ब्रिक्समध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचा दावा करणाऱ्या मीडिया रिपोर्टस त्यांनी फेटाळून लावले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा जवळचा मित्र असलेल्या तुर्कस्तानला वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या गटात सामील व्हायचे होते. पण भारताने त्यांचा मार्ग रोखला आहे.
तुर्कीला ब्रिक्स गटात समावेश करण्यापासून भारताने रोखल्याच्या बातम्या त्यांनी फेटाळल्या आहेत. रशियातील कझान येथे नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेत तुर्कस्तानला देखील सदस्य होण्याची इच्छा होती. पण तसे होऊ शकले नाही. इतकंच नाही तर पाकिस्तानला देखील सदस्य होता आलेले नाही. एका जर्मन टॅब्लॉइडने आपल्या अहवालात असा दावा केला होता की, भारताने तुर्कीच्या ब्रिक्समध्ये प्रवेशाला विरोध केला होता.
25 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्या तीन दिवसीय भारत दौऱ्यापूर्वी ही बातमी आलीये. तुर्कस्तान हा 13 देशांपैकी एक आहे ज्यांना यावर्षी BRICS भागीदार देशांमध्ये सामील होण्यास मान्यता देण्यात आली आहे. तुर्की अनेकदा काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानची भाषा बोलतो. मात्र आता त्याच्यात बदल झाल्याचे दिसून येत आहे.
तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान हे संयुक्त राष्ट्रात आपल्या भाषणात देखील काश्मीरचा मुद्दा सातत्याने मांडत आले आहेत, पण यंदाच्या भाषणात त्यांना तसं करणं टाळले होते. ब्रिक्स परिषदेत त्यांना सहभागी व्हायचे असल्यामुळे त्यांनी असे केल्याचं काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
ब्रिक्स शिखर परिषदेव्यतिरिक्त, तुर्कीला भारतात आपली गुंतवणूक वाढवण्याची इच्छा आहे. एर्दोगन यांनी शेवटचा 2023 मध्ये G20 शिखर परिषदेसाठी भारताला भेट दिली होती आणि त्यांची भेट सकारात्मक ठरली होती.
BRICS ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा समूह आहे. ज्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे मुख्य सदस्य आहेत. या देशांच्या नावांचे पहिले अक्षर घेऊन समूहाचे नाव BRICS असे ठेवण्यात आले होते.
अलीकडच्या काळात भारताच्या तुर्कस्तानसोबतच्या आर्थिक संबंधांना नवी गती मिळाली आहे. द्विपक्षीय व्यापारात लक्षणीय वाढ झाली असून, 2022-23 मध्ये $13.80 अब्ज ओलांडली आहे. सेंट्रल बँक ऑफ टर्किए डेटानुसार, भारतीय कंपन्यांनी तुर्कियेमध्ये सुमारे $126 दशलक्ष गुंतवणूक केली आहे. दुसरीकडे, भारताच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापाराच्या प्रचार विभागानुसार, तुर्कियेची भारतात सुमारे $210.47 दशलक्ष गुंतवणूक आहे.