Nupur Sharma : मुस्लीम देशांच्या आक्षेपावर भारत सरकारने तातडीने का कारवाई करतंय, जाणून घ्या मजबुरी
आखाती देशांच्या वक्तव्यावर भारत लगेच सक्रिय होण्यामागे विदेशी पैसा हेही एक कारण आहे. कोरोना संसर्ग भारतात येण्यापूर्वी 2019-20 मध्ये आखाती देशांमध्ये राहणाऱ्या लोकांनी देशात 6.38 लाख कोटी रुपयांहून अधिक पैसे पाठवले होते.
दिल्ली – भाजपच्या (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) पैगंबरांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भारताला अरब देशांच्या रागाचा सामना करावा लागत आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अरब देशांकडून ट्विटरवरती ट्रेंड चालवण्यात आला होता. तसेच ट्विटच्या माध्यमातून त्यांनी उत्तर देखील दिलं होतं. अरब देशांच्या आक्षेपावर भारत सरकारला सतत स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. याआधीही अशी परिस्थिती दोन प्रकरणांमध्ये पाहायला मिळाली होती. 2015 मध्ये खासदार तेजस्वी सूर्या यांनी सौदी अरेबियाच्या महिलांबद्दल एक ट्विट केले होते. अरब देशांनी निषेध केल्यानंतर तेजस्वीने ट्विट डिलीट करून जाहीर माफीही मागितली होती. दुसऱ्या प्रकरणामध्ये एप्रिल 2020 मध्ये जेव्हा निजामुद्दीन मरकझवर कोरोना पसरवल्याचा आरोप झाला. तेव्हा अरब देशांनी त्यावर टीका केली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ‘कोविड-19 जात, धर्म, रंग, पंथ, भाषा किंवा सीमा पाहत नाही.
अरब देशांच्या आक्षेपांवर भारताला एवढ्या तत्परतेने कारवाई का करावी लागते
भारताला दररोज एकूण 5 दशलक्ष बॅरल तेलाची गरज आहे आणि त्यातील 60% आखाती देशांमधून येते. गेल्या काही वर्षांत आखाती देशांवरील तेलावरील अवलंबित्व कमी झाले आहे. तरी भारतात वापरल्या जाणाऱ्या तेलाचा मोठा हिस्सा त्या देशातून येतो असं पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी या वर्षी मार्चमध्ये संसदेत सांगितले होते. भारत सरकारच्या धोरणनिर्मितीमध्ये तेलाचे महत्त्व कॅगच्या अहवालावरून स्पष्ट होते. त्यात म्हटले आहे की, भारताने 2020-21 मध्ये पेट्रोलियम सबसिडीवर 37,878 रुपये खर्च केले. भारतासाठी तेल हे केवळ वाहतुकीसाठीच नाही तर देशाच्या सामरिक सुरक्षेच्या दृष्टीनेही विशेष आहे. यामुळेच आखाती देशांच्या भावनिक प्रश्नांबाबत भारत अत्यंत संवेदनशील आहे.
आखाती देशात सुमारे 9 दशलक्ष भारतीय वंशाचे लोक राहतात
भारतातून मोठ्या प्रमाणात लोक नोकरीच्या शोधात आखाती देशांमध्ये जातात. तसेच आखाती देशात सुमारे 9 दशलक्ष भारतीय वंशाचे लोक राहतात. यापैकी 35 लाख लोक यूएईमध्ये तर 30 लाख लोक सौदी अरेबियामध्ये राहतात. कतार, सौदी अरेबियामध्ये अनेक मोठी भारतीय रिटेल स्टोअर्स आणि रेस्टॉरंट्स देखील आहेत. अशा परिस्थितीत नुपूर शर्माच्या वक्तव्यानंतर कतार आणि यूएईच्या सोशल मीडियावर ‘भारत बहिष्कार’ ट्रेंड होऊ लागला आहे. याचा परिणाम या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय कामगारांवर आणि त्यांच्या व्यवसायावर होणार होता हे मात्र निश्चित झालं आहे.
परदेशातून भारतात येणाऱ्या पैशात आखाती देश पुढे
आखाती देशांच्या वक्तव्यावर भारत लगेच सक्रिय होण्यामागे विदेशी पैसा हेही एक कारण आहे. कोरोना संसर्ग भारतात येण्यापूर्वी 2019-20 मध्ये आखाती देशांमध्ये राहणाऱ्या लोकांनी देशात 6.38 लाख कोटी रुपयांहून अधिक पैसे पाठवले होते. यापैकी 53 टक्के पैसा फक्त 5 आखाती देशांतून भारतात येतो. सौदी अरेबिया, कतार, कुवेत, ओमान आरबीआयच्या अहवालानुसार, भारतातील या पैशातील सर्वाधिक 59% हिस्सा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बंगाल या तीन राज्यांमध्ये येतो. यामुळेच आखाती देशांचा भावनिक मुद्दा भारताला हलक्यात घ्यावासा वाटत नाही.