कतारने 8 भारतीयांना का सुनावली फाशीची शिक्षा, आता पुढे काय ? नेमके प्रकरण काय ?
भारतीय नौदलाच्या ज्या अधिकाऱ्यांना कतारच्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे त्यांचे सर्व्हीस रेकॉर्ड एकदम चांगले असून त्यांना राष्ट्रसेवेसाठी राष्ट्रपती पदकांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आता भारत सरकार काय करणार ?
नवी दिल्ली | 27 ऑक्टोबर 2023 : कतारमध्ये भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने भारत सुन्न झाला आहे. या अधिकाऱ्यांवर इस्रायलला गुपितं पुरविल्याचा आरोप कतारने केला आहे. अल-जझीरा या वेबसाईटने दिलेल्या बातमीनूसार या अधिकाऱ्यांवर कतारच्या पाणबुडी संदर्भातील गुपिते इस्रायलला पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. परंतू या अधिकाऱ्यांवर नेमके काय आरोप ठेवलेत याची माहीती द्यायला कतारने नकार दिला आहे. भारत सरकारने नौदलाच्या या माजी अधिकाऱ्यांना सर्व कायदेशीर मदत पुरविण्याबरोबरच सर्व पर्याय खुले ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे.
भारतीय नौदलाच्या ज्या अधिकाऱ्यांना कतारच्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे त्यांचे सर्व्हीस रेकॉर्ड एकदम चांगले असून त्यांना राष्ट्रसेवेसाठी राष्ट्रपती पदकांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पुरेनेंदू तिवारी, कमांडर सुगुनकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश यांना कतारच्या गुप्तचर एजन्सीने 30 ऑगस्ट 2022 रोजी दोहा येथून अटक केली होती. एका अधिकाऱ्याने तामिळनाडू स्थित प्रतिष्ठीत डीफेन्स सर्व्हीसेस स्टाफ कॉलेज वेलिंगटनमध्ये इंस्ट्रक्टर म्हणून सेवा बजावली आहे. तर एका अधिकाऱ्याने विमानवाहू नौका आयएनएस विराटवर फायटर कंट्रोलर आणि नेविगेटिंग ऑफीसर म्हणून काम केले आहे.
नेमके काय काम करीत होते
कोर्ट ऑफ इन्स्टन्स ऑफ कतारने या प्रकरणात दोहात काम करणाऱ्या भारतीय नौदलाच्या आठ अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याचे गुरुवारी भारतीय परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे. भारताने कतार या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. हे भारतीय नागरिक ग्लोबल टेक्नॉलॉजीज एण्ड कंसल्टन्सी सर्व्हीसेसमध्ये काम करत होते. दहरा रॉयल ही कंपनी डीफेन्स सर्व्हीस प्रोवायडर म्हणून काम करणाऱ्या ओमानी वायू सेनेच्या माजी अधिकाऱ्याची आहे. भारतीय नौदलाचे माजी अधिकाऱ्यांनी कतारच्या आधुनिक पानबुड्यांची गुप्त माहीती इस्रायलला पुरविल्याचा कतारचा आरोप ठेवला आहे. कतार एका आधुनिक पाणबुडीवर काम करीत आहे. रडारपासून वाचण्यासाठी तिच्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. परंतू कतार किंवा भारताने याविषयी कोणतीही टीपण्णी केलेली नाही.
परत आणणे शक्य आहे का ?
भारतीय नौदलाच्या या माजी कर्मचाऱ्यांना वर्षभरापूर्वी हेरगिरीसाठी कतारने अटक केली आहे. या प्रकरणात त्यांचा आठ वेळा जामिन फेटाळण्यात आला आहे. कतारमध्ये भारतीय दुतावासाला सर्वात आधी सप्टेंबरच्या मध्यात कतारची गुप्तचर संस्था राज्य सुरक्षा ब्युरोने भारतीय नागरिकांना अटक केल्याचे कळले. त्यानंतर 30 सप्टेंबरला त्यांच्या कुटुंबियांना त्यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली. सुनावणी दरम्यान नौदलाच्या अधिकाऱ्यांना आरोपासंदर्भात सांगण्यात आले होते. परंतू ही बाब सार्वजनिक करण्यास त्यांच्यावर मनाई केली होती असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे. भारत सरकार त्यांना परत आणण्याचा निश्चय केला आहे.