शेख हसीना यांना देशात परत घेणार का? पाहा काय म्हणाले बांगलादेशचे नवे सरकार
बांगलादेशमध्ये सरकार विरोधात आंदोलन हिंसक झाल्यानंतर आणि जवळपास ३०० लोकांचा मृत्यू झाल्यानंतर शेख हसीना यांना पद सोडून देशातून बाहेर जावे लागले. त्यांनी भारतात आश्रय घेतला. पण आता पुन्हा एकदा त्यांना देशात यायचे असेल तर त्यांनी घेतलं जाईल का यावर नवीन अंतरिम सरकारने काय उत्तर दिलेय. पाहुयात.
बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलननंतर शेख हसीना यांना पंतप्रधानपद सोडावे लागले होते. इतकंच नाही तर त्यांना देश देखील सोडून जावे लागले. त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला. आता भारतातून त्या लंडनमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. पण यूके सरकारकडून कोणतेही सकारात्मक संकेत न मिळाल्याने त्या भारतातच थांबल्या आहेत. अमेरिकेने त्यांचा व्हिजा रद्द केलाय. त्यामुळे तिकडे जाण्याचे मार्ग ही बंद झाले आहेत. बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे गृह व्यवहार (गृहमंत्र्यांच्या समतुल्य) सल्लागार एम सखावत हुसेन यांनी आता शेख हसीना यांच्याबाबत त्यांच्या सरकारची भूमिका जाहीर केली आहे. देशात परत यावे आणि पुन्हा राजकारणात यावे त्यांनी म्हटले आहे. शेख हसीना यांनी देशात परत यावे आणि अवामी लीग पक्षाची नव्या चेहऱ्यांसह पुनर्रचना करावी, असेही हुसेन म्हणाले. ते म्हणाले की, माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर देश सोडण्याचा कोणताही दबाव नव्हता, त्यांनी स्वत:च्या इच्छेने देश सोडला. कोणीही त्यांना तसे करण्यास भाग पाडले नाही. हुसेन म्हणाले की, आम्ही त्यांना परत येण्यास सांगू आणि पक्षाची पुनर्रचना करू. देशात परत येऊन कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कायद्याने कारवाई होईल.
देश तुमचाच आहे
ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, सखावत हुसैन म्हणाले की, ‘तुम्ही देशात परतण्याचा विचार करत आहात. पण तुम्ही इथून का गेलात हा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या स्वेच्छेने गेलात आणि कोणीही तुमच्यावर जबरदस्ती केली नाही. हा तुमचा देश आहे आणि आम्ही तुमचा आदर करतो. तुम्ही परत यायचे ठरवले तर तुमचे स्वागत आहे. फक्त एकच विनंती की तुम्ही परत येऊन लोकांना चिथावणी देणे किंवा अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करणे टाळावे. जर तुम्ही असे केले तर ते कठीण होऊ शकते.
हसीना यांनी देशात परतावे : हुसेन
बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस, एम सखावत आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांनी हिंदू विद्यार्थी आणि तरुणांची बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सखावत यांनी हसीना यांच्या पुनरागमनाच्या प्रश्नावर ही उत्तर दिले. ते म्हणाले की, राष्ट्रीय पक्षाचे नेते हुसेन मुहम्मद इरशाद यांना देश सोडण्याचा किंवा तुरुंगात जाण्याचा पर्याय देण्यात आला तेव्हा इरशाद यांनी तुरुंगात जाण्याचा पर्याय निवडला. शेख हसीना यांनीही परतावे, असे आम्ही म्हणू.